Home Cities जामनेर जामनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास द्या ; शिवसेनेची...

जामनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास द्या ; शिवसेनेची तहसीलदारांकडे मागणी

0
23

जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबे तीव्र आर्थिक संकटात सापडली आहेत. अशा बिकट परिस्थितीत शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षणासाठी दररोज प्रवास करणाऱ्या इयत्ता १ ली ते १२ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना एसटी बसचा मोफत प्रवासी पास उपलब्ध करून देण्यात यावा, या मागणीचे लेखी निवेदन शिवसेनेच्या वतीने जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना सादर करण्यात आले.

तालुक्यात शिवसेनेच्या वतीने आयोजित ‘शिवसंवाद दौऱ्या’दरम्यान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला होता. या दौऱ्यात ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचा आणि दररोजच्या प्रवासाचा गंभीर प्रश्न समोर आला. अनेक गावांमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज तालुक्याच्या ठिकाणी किंवा शेजारच्या मोठ्या गावांमध्ये बसने प्रवास करावा लागतो. दुष्काळामुळे उत्पन्नाची साधने घटल्याने या बसप्रवासाचा दैनंदिन खर्च गरीब पालकांसाठी मोठा आर्थिक भार ठरत आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, केवळ प्रवासाचा खर्च परवडत नसल्यामुळे एकाही गरीब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याचे शिक्षण अधांतरी राहू नये, यासाठी शासनाने तातडीने संवेदनशील निर्णय घेणे गरजेचे आहे. मुलींना ज्याप्रमाणे सवलती व मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे, त्याच धर्तीवर दुष्काळग्रस्त व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व मुला-मुलींना गावातून शाळेपर्यंत मोफत एसटी बस पास सेवा पुरवण्यात यावी, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन सादर करताना शिवसेना युवा सेना जिल्हाध्यक्ष विश्वजीत पाटील, जामनेर तालुकाप्रमुख भरत पवार, कृष्णा चोरमारे, महबूब शेख, निखिल पाटील, अक्षय पाटील, विक्रम घोंगडे, अरुण सावकारे, राकेश चौधरी, पंडित नाईक, प्रवीण ठाकरे, भैया सूर्यवंशी, अमीन तडवी, भावसिंग राठोड, कैलास माळी, प्रेम पवार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound