मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्रात बंदी असलेल्या सुगंधित पानमसाला आणि गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात मुक्ताईनगर पोलिसांनी आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे मोठी धडक कारवाई केली आहे. बोदवड चौफुली परिसरातील एका हॉटेलसमोर उभ्या असलेल्या बोलेरो पिकअप वाहनातून तब्बल १५ लाख ८८ हजार ५०० रुपये किमतीचा प्रतिबंधित पानमसाला व जर्दा, तसेच ३ लाख २५ हजार रुपयांचे वाहन असा एकूण १९ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील एका चालकाला मुक्ताईनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर रोजी मुक्ताईनगर शहरात गस्त घालत असताना प्रभारी पोलीस निरीक्षक आशिष अडसुळ यांना गुप्त माहिती मिळाली की, एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा बोलेरो पिकअप (क्रमांक HR 84 2073) वाहनातून महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा व पानमसाला भरून वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलीस शिपाई रवींद्र धनगर आणि प्रशांत चौधरी यांच्या पथकाने बोदवड चौफुलीवरील हॉटेलसमोर संशयित वाहन गाठले. पोलिसांच्या पथकाने चालकाकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सदर वाहन चालक आणि वाहनासह मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

या कारवाईची माहिती मिळताच जळगाव येथील अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी योगराज किशोर सूर्यवंशी हे दोन शासकीय पंचांसह मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात हजर झाले. पंचांसमक्ष बोलेरो पिकअपच्या मागील बंद दरवाजा उघडून तपासणी केली असता, त्यामध्ये करड्या आणि गुलाबी रंगाच्या ३६ एचडीपीई गोण्या आढळून आल्या. या गोण्यांमध्ये ‘प्रीमियम राजनिवास सुगंधित पान मसाला’ आणि ‘प्रीमियम झेडएन ०१ जाफरानी जर्दा’ असा मानवी आरोग्यास अत्यंत घातक असलेला साठा आढळून आला. पोलिसांनी विचारपूस केली असता चालकाने आपले नाव शुभमसिंग विद्याराम (वय २५, रा. निनावाचा, ता. किरावली, जि. आग्रा, उत्तर प्रदेश) असे सांगितले.
चौकशीदरम्यान सदर प्रतिबंधित अन्नपदार्थ मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथून आणल्याचे चालकाने मान्य केले. मात्र, हा साठा कोणाकडून आणला आणि कोणाला पोहोचवला जाणार होता, याबाबत त्याने माहिती देण्यास नकार दिला. तसेच वाहनाची किंवा गुटख्याची कोणतीही अधिकृत कागदपत्रे त्याच्याकडे मिळून आली नाहीत. अन्न सुरक्षा अधिकारी सूर्यवंशी यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांनुसार तक्रार नोंदवली आहे. जप्त केलेला साठा मानवी सेवनास हानीकारक असल्याने त्याचे नमुने विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित सर्व माल व वाहन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.



