Home क्राईम बऱ्हाणपूर येथून गुटखा घेऊन जाणाऱ्या भरधाव कारचा निंभोरा फाट्याजवळ भीषण अपघात ;...

बऱ्हाणपूर येथून गुटखा घेऊन जाणाऱ्या भरधाव कारचा निंभोरा फाट्याजवळ भीषण अपघात ; दोघे गंभीर जखमी 

0
10

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथून महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा भरून चोपड्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारचा निंभोरा फाट्याजवळ भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कारमधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर कारची पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा आढळून आल्याने रावेर परिसरात खळबळ उडाली असून, हा प्रकार गुटखा तस्करीचा असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, एमएच २६ व्ही ४४२३ क्रमांकाची चारचाकी गाडी मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथून रावेरमार्गे चोपड्याकडे अत्यंत वेगाने जात होती. निंभोरा फाट्याजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघाताचा जोरदार आवाज ऐकून आसपासच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली आणि कारमध्ये अडकलेल्या दोघांना सुखरूप बाहेर काढले.

या घटनेची माहिती मिळताच रावेर येथील सामाजिक कार्यकर्ते शरद राजपूत यांनी विलंब न करता रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तात्काळ सावदा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) हलवण्यात आले आहे. दरम्यान, अपघातग्रस्त वाहनाची स्थानिक नागरिकांनी पाहणी केली असता, त्यामध्ये महाराष्ट्रात पूर्णपणे बंदी असलेला सुगंधित गुटखा साठवलेला असल्याचे उघडकीस आले. यावरून बुरहानपूरहून रावेरमार्गे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अवैध गुटख्याची वाहतूक केली जात असल्याचा संशय बळावला आहे. या घटनेमुळे रावेर परिसरातील सीमावर्ती भागातून होणाऱ्या गुटखा तस्करीचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभाग या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुटख्याचा मुख्य सूत्रधार आणि या रॅकेटचा पर्दाफाश करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound