राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या लाभार्थ्यांना मदत प्रदान

धरणगाव प्रतिनिधी । आपल्यावर आपत्ती आली असली तरी आता न रडता परिस्थितीशी लढायचे…आपल्या सोबत राज्य शासन ठामपणे उभे राहणार असल्याची ग्वाही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. ते राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या अंतर्गत तालुक्यातील २१ महिला लाभार्थ्यांना मदत प्रदान करतांना बोलत होते.

याबाबत वृत्त असे की,  राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या  १८ ते ५९  वर्षे वयोगटातील कमावत्या  व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना १ महिन्याच्या आत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत एकरकमी  २० हजारांचा अर्थसहाय्याचा धनादेश दिला जातो. या अंतर्गत धरणगाव तालुक्यातील २० महिलांना प्रत्येकी २० हजार या प्रमाणे एकूण ४ लाख मंजूर प्रस्तावाचे धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या  हस्ते वितरीत करण्यात आले. तहसीलदार नितीनकुमार देवरे  यांनी प्रास्ताविकात योजनेसंदर्भात सविस्तर माहिती विषद केली.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  धरणगाव  तालुक्यातील २० महिलांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत ४  लाखांचे तर एका आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या महिला वारसाला १ लाखाच्या मदतीचे धनादेश व पिठाची गिरणी प्रदान करण्यात आली. सर्व २१ गरजू महिलांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते १ महिन्याचा किराणा व साडी व पातळ देण्यात आले.

याप्रसंगी आशाबाई महाजन (आनोरा), आशाबाई  शिरसाठ (पथराड बु ), सुरेखा काळे. (एकलग्न बु), सरला पाटील,  वैशाली  शिरसाठ, वंदना चौधरी, कविता पाटील,  तरन्नुम  शेख सलीम, अक्काबाई  पारधी, रामवती मोरावकर  (सर्व धरणगांव) , सुनिता संतोष पाटील, छाया भोई (चांदसर बु),  उषाबाई सोनवणे, सुशिलामाळी (साळवा ), ज्योती पाथरवट (भामर्डी), विमलबाई  भिल (वराड बु ), रोहनाबी पठाण (बोरगांव खु), मिना सुतार (बोरगांव खु), रत्नाबाई चौधरी (धरणगांव), सुरेखाबाई शिरसाठ (धानोरा ) या महिलांना शासकीय मदतीचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, सध्याची स्थिती ही अतिशय बिकट अशी असून अनेक कुटुंबांना खडतर स्थितीला सामोरे जावे लागत आहे. मात्र आपल्याला आलेल्या परिस्थितीशी दोन हात करून पुढे जायचे आहे. यासाठी राज्य शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सर्व लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेतून शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही देखील पालकमंत्र्यांनी याप्रसंगी दिली.

यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ,  सभापती प्रेमराज पाटील, उपसभापती प्रेमराज पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, धानोरा सरपंच भगवान महाजन, तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार एल एन सातपुते , प्रथमेश मोहोळ, न.पा. गटनेते पप्पू भावे, नगरसेवक विलास महाजन, मोहन महाजन, उपसरपंच विलास पवार, महिला आघाडीच्या जना अक्का पाटील, मोहन महाजन, विनोद रोकडे यांच्यासह लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी  प्रास्ताविकात सदर योजनेबाबत माहिती सादर केली.सूत्रसंचालन व आभार नायब तहसीलदार एल. एन. सातपुते यांनी मानले, त्यांना सहकार्य नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, गायधनी, भट यांनी केले.

 

Protected Content