शेतकऱ्यांना बियाणे, खते व औषधींचा पुरेसा साठा उपलब्ध करा-आ.अनिल पाटील


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खरीप हंगाम मध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आवश्यक बियाणे, खते व औषधे मिळावीत, यासाठी कृषी विभागाने तातडीने आणि योग्य नियोजन करावे, तसेच बोगस व नकली खते व औषधी विक्रीवर कठोर कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिल्या आहेत.

अमळनेर नगरपालिकेच्या सभागृहात खरीप हंगाम 2025-26 साठी तालुकास्तरीय कृषी नियोजन व आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आमदार पाटील यांनी मुंबईहून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेत मार्गदर्शन केले. त्यांनी कृषी विभागाला निर्देश दिले की, खरीप हंगामात इनपुट्सची (बियाणे, खते, औषधे) कोणतीही टंचाई भासू नये यासाठी पुरेसा साठा व वेळेत वितरण यावर भर द्यावा.

तसेच, अवकाळी पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन त्वरित पंचनामे करावेत आणि मदतीचे प्रस्ताव सादर करावेत, असे आदेश प्रांत अधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले. पिकविमा योजना, शेतकऱ्यांची केवायसी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता यावरही ऑनलाईन आढावा घेण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे होते. यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे तसेच विविध विभागांचे अधिकारी व कृषी सहाय्यक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी चंद्रशेखर साठे यांनी खरीप हंगाम नियोजनाची प्रस्तावना मांडली. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे यांनी पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे खरीप हंगामासाठीच्या बियाणे, खते, औषधे यांचा मागणी-पुरवठा ताळमेळ तसेच विविध कृषी योजनांचा सविस्तर आढावा सादर केला.

या बैठकीत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, रोजगार हमी योजना, जलतारा योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यावरही सखोल चर्चा झाली. उपविभागीय अधिकारी मुंडावरे आणि तहसीलदार सुराणा यांनी संबंधित योजनांचा आढावा घेतला.

या बैठकीतून खरीप हंगामाच्या यशस्वीतेसाठी कृषी विभाग सज्ज असून, शेतकऱ्यांना सुलभ सेवा आणि शाश्वत उत्पादनाचे उद्दिष्ट गाठण्याचा निर्धार करण्यात आला.