परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ पाचोऱ्यात निषेध आंदोलन

पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ १६ डिसेंबर रोजी पाचोरा शहरातील रेल्वे स्थानक रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून समता सैनिक दलातर्फे धिक्कार मोर्चा काढण्यात आला. तसेच घटनेच्या निषेधार्थ प्रशासनास निवेदन देण्यात आले. निवेदन देते प्रसंगी समता सैनिक दलाचे जिल्हा अध्यक्ष किशोर डोंगरे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे, जिल्हा सचिव अरुण खरे, तालुका उपाध्यक्ष विक्की ब्राह्मणे, तालुका सचिव दशरथ तांबे यांचेसह समता सैनिक दलाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, ज्योतिराव फुले स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले.

१० डिसेंबर २०२४ रोजी परभणी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ असलेली संविधानाची प्रतिकृती फोडण्यात आली. तिची विटंबना करण्यात आली. या घटनेमुळे समस्त लोकशाहीवादी, संविधान प्रेमी तसेच आंबेडकरवादी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हे कृत्य करणाऱ्या देशद्रोही समाजकंटकांवर त्वरित कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी समता सैनिक दलातर्फे करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर परभणी येथे आंबेडकरी समाजाने सामुहिकरित्या निषेध नोंदविला आणि आंदोलन केले असता त्यामुळे शांतता भंग झाल्याचा ठपका ठेवून परभणी येथील आंबेडकरी समाजाच्या, बौद्ध समाजाच्या लोकांवर पोलिसांनी कठोर कारवाई चालू केली आहे. बौद्धांना घरात घुसून पोलीस मारहाण करीत आहेत. निरपराध लोकांना अटक केली जात आहे. वेगवेगळी गंभीर कलम लावून सुशिक्षित तरुणांना आरोपी केले जात आहे. ही हुकूमशाही त्वरित थांबविण्यात यावी. या घटनेत शहीद झालेले संविधान प्रेमी सोमनाथ सुर्यवंशी यांची संशायास्पद मृत्यु झाला. त्यांच्या मृत्युचे सकारण सखोल न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. तसेच या सर्व घटनेची सखोल न्यायालयीन चौकशी करून बौद्ध समाजावर चालविला जाणारा अन्याय बंद करावा अन्यथा या अत्याचार विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. अशा आषयाचे निवेदन समता सैनिक दलातर्फे तहसिलदार व पोलिस प्रशासनास देण्यात आले आहे.

Protected Content