फैजपूर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाला शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील अव्यवसायिक गटातील उत्कृष्ट महाविद्यालयाचा आणि उत्कृष्ट मूल्यांकन केंद्राचा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यगौरव सोहळ्यात प्रमुख अतिथी माजी कुलगुरू प्राचार्य डॉ के बी पाटील यांच्या शुभहस्ते तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री शिरीषदादा मधुकरराव चौधरी यांच्या सहित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.डॉ. सुधाकर चौधरी, चेअरमन लीलाधर चौधरी, सचिव प्रा. मुरलीधर फिरके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांच्यासहित व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.व्ही.एल. माहेश्वरी, प्र.कुलगुरू प्रा.डॉ.एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्यासहित मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाच्या शिरोपेच्यात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला त्यात उत्कृष्ट मूल्यमापन केंद्र म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र बी वाघुळदे यांच्यासहित केंद्र समन्वयक प्रा डॉ मारुती जाधव यांचाही सन्मान करण्यात आला. लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या दूरदृष्टीकोनातून फैजपूर व पंचक्रोशीतील सामान्य, अति सामान्य कुटुंबाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाची सोय व्हावी व करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून समाज उत्थानाचे उदात्त कार्य साध्य होण्याच्या हेतूने सन 1961 साली धनाजी नाना महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.
स्थापनेपासूनच महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्रशासन, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सेवाभावी वृत्तीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पारंपारिक अभ्यासक्रमासहितच नवनवीन व्यावसायिक अभ्यासक्रम, विद्यापीठाच्या विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना, विद्यार्थी विकास विभाग, क्रीडा विभाग यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण तयार केले. यासहित स्पर्धा परीक्षेची योग्य तयारी व्हावी या दृष्टीने कै दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधिनीच्या माध्यमातून हुशार, होतकरू व मेहनती विद्यार्थ्यांना राज्य व केंद्र सरकारच्या विविध खात्यात सन्मानाची नोकरी प्राप्त करून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली. अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि मूल्यमापन ही मूलभूत कामे करीत असतानाच विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक अंगाचा विकास व्हावा या दृष्टीने तब्बल तीन आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवांचे यशस्वी आयोजन, विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा, परिषदा, चर्चासत्रे, शिबिरे, विद्यापीठीय क्रीडा स्पर्धांची आयोजने यात सक्रिय सहभाग नोंदवला. स्थापनेपासून आजतागायत सातत्यपूर्ण महाविद्यालयाने विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवला आहे सद्यस्थितीत 37 एकरचा विस्तीर्ण व वृक्षराईने नटलेला सुंदर परिसर आणि समर्पित प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गामुळे रावेर व यावल तालुक्यातील विद्यार्थ्यांना महाविद्यालय भुरळ घालते.
उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे अध्यक्ष श्री शिरीषदादा चौधरी यांनी पुरस्कारामुळे समर्पित वृत्तीने केलेल्या परिश्रमाचे साफल्य झाल्याचा अत्यानंद होत असून यामुळे भविष्यात अधिकाधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे सर्व सोयी सुविधानी उपयुक्त असे महाविद्यालय म्हणून कामगिरी करण्यास बळ मिळाल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वाघुळदे यांनी उत्कृष्ट महाविद्यालयाचे पुरस्काराचे श्रेय स्थापनेपासून आजतागायत व्यवस्थापन, प्रशासन, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना दिले असून या पुरस्कारामुळे बळ प्राप्त झाले असून येणाऱ्या काळात सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट काम करण्याची नैतिक जबाबदारी येऊन पडली आहे व सर्वांच्या सहकार्याने, एकजुटीतून ती जबाबदारी समर्थपणे पेलू अशी हमी व्यक्त केली. या पुरस्कारामुळे महाविद्यालयातील प्रत्येक घटकाचा अभिमानाने उर भरून आला असून महाविद्यालयात प्रचंड उत्साहाचे वातावरण पसरले आहे.