जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा सर्वत्र निषेध नोंदविला जात आहे. या अनुषंगाने जळगावात शिवसेना महानगरच्या वतीने बुधवार, दि. २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता महापालिकेसमोर शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या नेतृत्वात निषेध व्यक्त करत जोडेमारो आंदोलन करण्यात आले.
जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे मार्गदर्शन करतांना सांगितले की, “शिवसेनेने रामदास कदम यांना नेतेपद, आमदारकी दिली. विरोधी पक्षनेते पदासारखे मोठे पद कदम यांना दिले. मात्र, यानंतरही त्यांनी उपकाराची परतफेड बंडखोरीने केली. पक्षाच्या नेत्यांविरोधात आक्षेपार्ह विधान करणार्या कदम यांना भविष्यात पश्चात्ताप झाल्याशिवाय राहणार नाही. रामदास कदम यांना तब्बल दोन वेळा शिवसेनेने विधानपरिषद दिली. तरी देखील शिवसेनाप्रमुखांच्या कुटुंबाबद्दल खालच्या पातळीवर टीका करतील, अशी अपेक्षा कोणी केली नव्हती. कदम यांनी त्यांचा खरा रंग दाखविला. रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे कुटुंबाची माफी त्यांनी मागावी.” अशी मागणी केली आहे.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील, गटनेते सुनिल महाजन, महिला आघाडीच्या मनिषा पाटील, प्रशांत सुरळकर, यांच्यासह शिवसेना महानगरचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.