शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकांनी घेतले प्रशिक्षण

जळगाव प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्राध्यापकांना बदललेल्या अभ्यासक्रमाबाबत प्रशिक्षण हे दोन दिवसीय कार्यशाळेतून देण्यात आले. प्रशिक्षणातून सहभागी प्राध्यापकांना पदवीच्या नवीन अभ्यासक्रमात झालेल्या बदलांची माहिती देण्यात आली. 

भारतीय वैद्यकीय परिषदचे (एमसीआय) नाव राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) असे झाले आहे. या आयोगाच्या निर्देशानुसार हे प्रशिक्षण घेणे सक्तीचे आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदवीच्या अभ्यासक्रमात आता बदल झालेला आहे. या बदलानुसार विद्यार्थ्यांना आता कौशल्याधारित अभ्यासक्रम असून केवळ भरमसाठ तासिकांऐवजी लघुतासिका घेणं यासह रुग्णालयात रुग्णसेवेत विद्यार्थ्यांना दाखल करून घेणे हा भाग समाविष्ट करून घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता यंदापासून “ऑन जॉब ट्रेनिंग” देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी प्राध्यापकांना अद्ययावत माहिती देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे वैद्यकीय शिक्षण तंत्रज्ञान युनिटच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले. 

उदघाटन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दीपप्रज्वलन करून केले. प्रसंगी उपअधिष्ठाता डॉ. मारुती पोटे (पदवीपूर्व), उपाधिष्ठाता डॉ. अरुण कासोटे (पदव्युत्तर) उपस्थित होते. यावेळी डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले की, प्राध्यापकांना बदलत्या काळानुसार अपडेट राहणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना आपण जितके अधिक ज्ञान देऊ तेवढे कमीच असते. स्वतःचे आरोग्य जपून कुठलेही तणाव न घेता प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात अध्यापनाची प्रक्रिया राबवावी, असेही ते म्हणाले. 

प्रशिक्षण कार्यशाळेत डॉ. किशोर इंगोले, डॉ. विजय गायकवाड, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. विलास मालकर, डॉ. संगीता गावित, डॉ. इम्रान तेली, डॉ. योगिता सुलक्षणे, डॉ. मोनिका युनाती, डॉ. जितेंद्र सुरवाडे यांनी मार्गदर्शन केले. सकाळी ९ ते ५ यावेळेत हे प्रशिक्षण पार पडले. सहभागीं अध्यापकांनी प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात देखील माहिती जाणून घेतली. प्रशिक्षणात ३० प्राध्यापकांचा सहभाग होता. 

समारोप अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांच्या उपस्थितीत झाला. सहभागींच्या वतीने डॉ. शैला पुराणिक, डॉ. बाळासाहेब सुरोसे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेसाठी डॉ. गणेश लोखंडे, विशाल दळवी, प्रदीप जैस्वाल, राकेश सोनार, राकेश पिंपळकर यांनी परिश्रम घेतले.

Protected Content