जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मध्यप्रदेशातील जावद विधानसभा क्षेत्रातील सिंगोली गावाजवळ कचोला येथील हनुमान मंदिरात प. पू. शैलेष मुनिजी, प. पू. मुनीन्द्र मुनिजी आणि प. पू. बलभद्र मुनिजी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेने जैन समाजात तीव्र संताप निर्माण झाला आहे. या हल्ल्यातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, अशी मागणी जळगाव येथील सकल जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जैन समाजाचे संत नेहमीच भगवान महावीर स्वामींच्या विचारांचा प्रसार करतात. ते शांती, दया आणि धर्माचे महत्त्व सांगतात. अहिंसेचे पुरस्कर्ते असलेले हे संत समाजात सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, काही विघटनवादी आणि समाजकंटक लोक समाजात बिघाड निर्माण करण्याच्या उद्देशाने संतांवर प्राणघातक हल्ले करत आहेत. अशा गुंडांना कठोर शिक्षा होणे अत्यंत आवश्यक आहे, असे सकल जैन समाजाने म्हटले आहे.
जळगाव येथील जैन समाजाने या घृणास्पद घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहोचवून दोषींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. जैन संतांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने पाऊले उचलण्याची गरज आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल आणि संतांना सुरक्षित वातावरण मिळेल.