आजतरी सोलापुरातून लढण्यावर ठाम : प्रकाश आंबेडकर

4Prakash Ambedkar 5 0

अकोला (वृत्तसंस्था) ‘मी आजतरी सोलापुरातून लढण्यावर ठाम आहे. उद्याचे सांगता येणार नाही,’ असे म्हणत वंचित बहुजन आघाडीची स्थापना करणारे भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणूक सोलापूरमधून लढणार असल्याचे संकेत दिले आहे. परंतु यामुळे कॉंग्रेसच्या गोटात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. कारण सोलापूरमधून निवडणूक लढविल्यास त्यांची लढत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याशी होणार असून त्याचा फायदा भाजपला होण्याची अधिक शक्यता आहे.

अकोला येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी आज तसे संकेत दिले. आंबेडकरांच्या या भुमिकेमुळे संभ्रम कायम आहे. ते अकोला आणि सोलापूर अशा दोन्ही मतदारसंघांतून लढू शकतात, असेही बोलले जात आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमशी युती करून बहुजन वंचित आघाडी स्थापन केली आहे. त्यांच्या सभांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही वंचित बहुजन आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांचे विभाजन करण्याची शक्यता असल्याने प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. प्रकाश आंबेडकर पूर्वी खासदार असलेल्या अकोल्याची जागा सोडण्याची तयारीही दाखवण्यात आली होती. मात्र, आता त्यांनी सोलापूरमधून लढण्याची तयारी केल्याचे समजते. प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग सोलापुरात असल्याचे मानले जाते. दरम्यान, सोलापूरमधून काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे हे निवडणूक लढवणार आहेत. मागील वेळेस मोदी लाटेत शिंदे यांचा पराभव झाला होता. यावेळी पुन्हा ही जागा काँग्रेसच्या खात्यात येईल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांना होता. मात्र, अचानक आंबेडकरांचे नाव समोर आल्याने काँग्रेसच्या गोटात भीती पसरली आहे.

Add Comment

Protected Content