पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषद, महाराष्ट्रतर्फे दिला जाणारा “राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार – २०२२” जळगाव जिल्ह्यातील प्रा. शिवाजी शिंदे (पाचोरा) व गुणवंतराव पवार यांना जाहीर झाला आहे. प्राथमिक विभागातील गुणवंतराव वामनराव पवार व माध्यमिक विभागातील प्रा. शिवाजी भास्कर शिंदे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषदेच्या अधिवेशनात दि. ३० आॅक्टोबर रोजी जयसिंगपूर (कोल्हापूर) येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. माँ. साहेब जिजाऊ यांचे बारावे वंशज तथा महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेश अध्यक्ष व्यंकटराव जाधव, महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषदेचे जिल्हाध्यक्ष नारायण दशरथ महाजन (चाळीसगाव) व जिल्हा सचिव प्रवीण मोरे (चाळीसगाव) यांच्या शिफारशीनुसार प्रदेश कार्यकारिणीने प्रा. शिवाजी शिंदे व गुणवंतराव पवार यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. गुणवंतराव पवार हे गोराडखेडा ता. पाचोरा येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक पदावर सेवेत आहेत. मागील ३६ वर्षात त्यांना दलित साहित्य अकादमी, रोटरी क्लब पाचोरा व चाळीसगाव, समता शिक्षण परिषद, तसेच तालुकास्तर आणि जिल्हास्तर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. विविध स्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. तर प्रा. शिवाजी शिंदे हे गेल्या २८ वर्षापासून अध्यापन सेवेत असून माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, कोंडवाडा गल्ली पाचोरा येथे ते सेवारत आहेत.
राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर विविध विषयांचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले आहे. पत्रकार, लेखक, कवी, निवेदक म्हणून त्यांची ओळख आहे. राष्ट्रीय जनगणना कार्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. यापूर्वीही त्यांना डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, मराठा सेवा संघ – संभाजी ब्रिगेड, शिक्षक आमदार अपूर्व हिरे, रोटरी क्लब ऑफ पाचोरा, तसेच रोटरी क्लब चाळीसगाव, समाज प्रबोधन संस्था नाशिक, दर्जी फाउंडेशन, अशा विविध संस्था संघटना तर्फे पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे. सन – २०१८ च्या नगरपालिकेचे स्वच्छता विषयक ब्रँड अँबेसेडर व सतत तीन वर्ष पाचोरा लोक न्यायालयाचे पंच न्यायाधीश म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषदेने निवड केलेल्या दोनही गुणवंत शिक्षकांचे जिल्हाभरातुन कौतुक व अभिनंदन केले जात आहे.