वायनाड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वायनाड लोकसभा मतदारसंघामध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी वायनाडमध्ये काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत रायबरेली आणि वायनाड अशा दोन लोकसभा मतदारसंघांमधून विजय मिळाल्यानंतर वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा दिला होता.
त्यामुळे या मतदारसंघातील जागा रिक्त झाली होती. तिथे काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती. दरम्यान, आज प्रियंका गांधी यांनी रोड शो च्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रियंका गांधी यांच्या रोड शोमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे नेते उपस्थित होते. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी सकाळी ११ वाजता कलपेट्टा न्यू बस स्टँड येथून रोड शो ला सुरुवात केली. या रोड शोनंतर प्रियंका गांधी यांनी सभेला संबोधित केले.
यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या की, मागच्या ३५ वर्षांपासून मी वेगवेगळ्या निवडणुकांसाठी प्रचार करत आहे. आता मी पहिल्यांदाच तुमच्या पाठिंब्याची मागणी करण्यासाठी इथे आले आहे. ही एक वेगळी जाणीव आहे. मला वायनाड येथून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दिल्याबद्दल मी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे आभार मानते.