नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) केंद्र सरकारने उपाययोजना करून किंवा नियम बनवून खाजगी कंपन्यांनासुद्धा ग्रामीण तसेच दुर्गम भागातील संचार सेवा बळकट करण्यासाठी सेवा देण्यास प्रवृत्त केले पाहिजे, अशी मागणी खासदार रक्षाताई खडसे यांनी तारांकित प्रश्न क्रमांक ६१ द्वारे आज (दि.२६) संसदेत केली.
या प्रश्नास दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी अनुकूलता दर्शवत बीएसएनएल बरोबरच खाजगी कंपन्यांना सेवा देतील यासाठी दूरसंचार मंत्रालय प्रयत्नशील राहील, असे आश्वासन दिले.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील डिजिटल इंडिया साकार व्हावे आणि शेतकऱ्यांनी इंटरनेटचा वापर करून त्यांचा आर्थिक स्तर उंचावा यासाठी ग्रामीण तसेच अतिदुर्गम भागातील संचार सेवा बळकट होण्यासाठी बीएसएनएल शक्य असेल त्या ठिकाणी संचार सेवा पुरवण्याचा प्रयत्न करत आहे.
परंतु या ठिकाणी नफा मिळत नसल्यामुळे खाजगी संचार कंपन्या सेवा पुरविण्यास उत्सुक नसतात. या कारणास्तव ग्रामीण व अतिदुर्गम भागातील ग्राहकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते,असा मुद्दाही त्यांनी यावेळी मांडला.