भारतरत्न पुरस्कारासंदर्भातील सोशल मिडीयावरची मोहीम थांबवण्याचे रतन टाटांचे आवाहन

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । लोकभावनेचा आदर करीत भारतरत्न पुरस्कारासंदर्भातील सोशल मिडीयावरची मोहीम थांबवण्याचे आवाहन रतन टाटा यांनी केले आहे

भारतीय उद्योगक्षेत्रातील मोठं नाव, टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी सोशल मीडियावर एक मोहीम राबवली जात आहे. ट्विटरच्या माध्यमातून एक समूह रतन टाटा यांचा भारतरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात यावा अशी मागणी करत आहे. आता रतन टाटा यांनीही ट्विटरवर याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

“सोशल मीडियावर लोकांकडून पुरस्कारासंबंधी ज्या भावना व्यक्त केल्या जात आहेत, त्या भावनांचा मी आदर करतो. पण मी नम्रपणे विनंती करतो की अशा प्रकारची कोणतीही मोहीम राबवली जाऊ नये. मी भारतीय असल्याचा आणि भारताच्या प्रगती आणि समृद्धीमध्ये योगदान करु शकलो त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यशाली समजतो”, असं ट्वीट रतन टाटा यांनी केलं आहे. या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या भावनांचा तर आदर केलाच. सोबतच आपण भारतासाठी काही करु शकलो यातच समाधानी असल्याचं सांगत त्यांनी पुन्हा एकदा आपला मोठेपणा सिद्ध केला आहे.

 

मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा यांनी रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर ट्विटरवर ही मोहीम राबवली जात आहे. डॉ. बिंद्रा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, ‘रतन टाटा यांचं माननं आहे की, आजच्या उद्योजकांची पिढी भारताला पुढील स्तरावर घेऊन जाऊ शकते. भारताचे सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची आम्ही मागणी करतो. आमच्या या मोहीमेशी जोडले जा आणि या ट्वीटला जास्तीत जास्त रिट्वीट करा’, त्यानंतर ट्विटरवर RatanTata आणि BharatRatnaForRatanTata हा हॅशटॅग टॉप ट्रेंडवर आला आहे.

Protected Content