साताऱ्यात होणार ‘हाय व्होल्टेज’ लढत ; उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण रिंगणात

prithviraj chavan contest against udayanraje

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी लोकसभा अध्यक्षांकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने मिळून उदयनराजेंविरुद्ध माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा रिंगणात उतरवायचे ठरवल्याचे वृत्त आहे. एकंदरीत सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ‘हाय व्होल्टेज’ होणार असल्याचे स्पष्ट आहे.

 

आघाडीच्या सध्याच्या समीकरणांनुसार साताऱ्याची जागा ही राष्ट्रवादीच्या वाट्याला येते. मात्र, ही जागा आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सोडण्यास तयार असल्याचे कळते. दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय झाल्याचे कळते. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. मात्र, आता उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेना ही जागा त्यांच्यासाठी सोडेल हे स्पष्ट आहे. त्यामुळे नरेंद्र पाटील अपक्ष निवडणूक लढवण्याचीही शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी साताऱ्यात उदयनराजेंविरुद्ध माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा रिंगणात उतरवायचे ठरवले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीतून तसे आदेशही देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे आता सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चांगलीच हाय व्होल्टेज होईल या शंका नाही. दरम्यान,  पोटनिवडणुकीत उदयनराजेंना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला हाताशी धरत मोठी रणनीती आखली असल्याची चर्चा आहे.

Protected Content