जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पत्नीचे मेडीकल बील मंजूर करण्यासाठी महाविद्यालयातील शिपायाकडून 3 हजार 600 रूपयांची लाच घेतांना निपाणे येथील मुख्याध्यापकास दुसऱ्यांदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी 29 मे रोजी सायंकाळी 5 वाजता रंगेहाथ पकडले. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील श्री. संत हरिहर माध्यमिक महाविद्यालयात तक्रारदार हे शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पत्नीचे मेडीकल बीलाचे 23815 रूपये मंजूरीसाठी मुख्याध्यापक संदीप प्रभाकर महाजन यांचेकडे अर्ज केला होता. सदर मेडिकल बिल स्वतःचे वैयक्तिक ओळखीने सिव्हिल हॉस्पिटल जळगाव व वेतन अधीक्षक माध्यमिक शिक्षण विभाग जळगांव यांच्याकडे प्रस्ताव सादर करून मंजूर करून देण्याचे मोबदल्यात मुख्याध्यापक संदीप महाजन यांनी तक्रारदार शिपायाकडे पाच हजार रूपयांची मागणी केली. तडजोडीअंती 3 हजार 600 रूपये देण्याचे ठरले. याबाबत शिपाई यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत विभागाने सापळा रचून मुख्याध्यापकास 3 हजार 600 रूपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.