पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपूर दौऱ्यावर

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपूरच्या दौऱ्यावर येणार असून, विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या या भेटीत चार प्रमुख उपक्रमांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 9 वाजता रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर येथे दर्शन घेऊन आद्य सरसंघचालकांना आदरांजली वाहतील. यानंतर ते बौद्ध धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या दीक्षाभूमीला भेट देणार आहेत.

सकाळी 10 वाजता पंतप्रधान माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या पायाभरणी समारंभाला उपस्थित राहणार आहेत. हे केंद्र नागपूरमधील महत्त्वाचे सुपर-स्पेशालिटी नेत्ररोग संशोधन आणि उपचार केंद्र आहे. 2014 मध्ये सुरू झालेल्या माधव नेत्रालयाच्या विस्तारीकरण प्रकल्पात 250 खाटांचे रुग्णालय, 14 बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि 14 अत्याधुनिक मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर असतील. या केंद्राचा उद्देश सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आणि जागतिक दर्जाच्या नेत्रचिकित्सा सेवा उपलब्ध करून देणे हा आहे.

दुपारी 12:30 वाजता पंतप्रधान सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडमध्ये युद्धसामग्री चाचणी तळ आणि मानवविरहित हवाई वाहनांसाठी (यूएव्ही) नव्याने उभारण्यात आलेल्या धावपट्टी सुविधेचे उद्घाटन करतील. या हवाई पट्टीची लांबी 1250 मीटर आणि रुंदी 25 मीटर असून, येथे लोइटरिंग युद्धसामग्री आणि मार्गदर्शित क्षेपणास्त्र चाचण्या घेण्यात येणार आहेत.

या सर्व कार्यक्रमांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्याची सांगता करून छत्तीसगडकडे रवाना होतील.

Protected Content