बोंबला : आता औषधीच्या किंमतीत होणार वाढ !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे इंधनासह इतर वस्तूंमुळे महागाई कडाडली असतांनाच लवकरच तब्बल आठशे औषधींच्या मूल्यांमध्ये वाढ होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नॅशनल फार्मा प्रायसींग ऑथॅरिटी अर्थात एनपीपीए या संस्थेने औषधांचे मूल्य वाढविण्याची शिफारस केली आहे. यामुळे शेड्यूल्ड या प्रकारातील सुमारे आठशे औषधांचे मूल्य वाढणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

नॅशनल फार्मा प्राइसिंग अथॉरिटीकडून शेड्यूल्ड औषधांच्या किमतींमध्ये १०.७ टक्के वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. शेड्यूल्ड प्रकारातील औषधांचा समावेश हा अत्यावश्यक औषधांमध्ये होतो. या औषधांवर सरकारचे नियंत्रण असते, परवानगीशिवाय या प्रकारातील औषधांचे दर वाढवता येत नाहीत. देशामध्ये शेड्यूल प्रकारात ८०० पेक्षा अधिक औषधांचा समावेश आहे. काल ‘एनपीपीए’च्या वतीने औषधांच्या किमतींबाबत एक नोटीस देखील जारी करण्यात आली आहे. यानुसार आता येत्या काही दिवसांमध्ये औषधांचे मूल्य वढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

औषध निर्मितीसाठी लागणार्‍या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच मनुष्यबळाची किंमत देखील वाढली आहे. अशा स्थितीमध्ये औषधांच्या निर्मितीचा खर्च वाढला आहे. पूर्वीच्या दरात औषधांची विक्री करणे परवडत नसल्याने औषधांचे दर वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. यानुसार एनपीपीएने दरवाढीला हिरवा कंदील दिल्याची माहिती समोर आली आहे. अर्थात, याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!