Home आरोग्य इबोला विषाणूचा वाढता धोका ; महाराष्ट्राच्या शेजारील आंध्र प्रदेशात हायअलर्ट

इबोला विषाणूचा वाढता धोका ; महाराष्ट्राच्या शेजारील आंध्र प्रदेशात हायअलर्ट


 विशाखापट्टणम- वृत्तसेवा आफ्रिकेतील काही देशांमध्ये इबोला विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यातून होत असलेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर भारतातही खबरदारीचा इशारा देण्यात येत असून महाराष्ट्राच्या शेजारील आंध्र प्रदेश राज्यात आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली आहे. संभाव्य संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने विविध विभागांना हायअलर्टवर राहण्याचे आदेश दिले असून आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रवाशांचे स्क्रिनिंग सुरू करण्यात आले आहे. यामुळे देशात पुन्हा एकदा संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची सतर्कता वाढल्याचे दिसून येत आहे. आफ्रिकेतील डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या देशांमध्ये इबोला विषाणूचे रुग्ण वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आंध्र प्रदेश सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. विशेषतः परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून संभाव्य धोका लक्षात घेऊन विमानतळ प्रशासन आणि जिल्हा आरोग्य विभाग यांच्यात समन्वय वाढवण्यात आला आहे.

आंध्र प्रदेशचे आरोग्यमंत्री सत्यकुमार यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार विशाखापट्टणम, तिरुपती आणि विजयवाडा या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासाचा इतिहास तपासला जात असून त्यांचे आरोग्य परीक्षणही केले जात आहे. परदेशातून विशेषतः आफ्रिकेतील बाधित देशांतून आलेल्या प्रवाशांवर अधिक बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. विमानतळांवरील वैद्यकीय पथके, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य अधिकारी यांच्यात सातत्याने समन्वय साधला जात आहे.

इबोलाची लक्षणे दिसणाऱ्या प्रवाशांना तातडीने क्वारंटाईन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर संशयित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. हवाई मार्गासोबतच विशाखापट्टणम बंदर आणि रस्ते मार्गाने राज्यात येणाऱ्यांवरही देखरेख ठेवण्यासाठी विशेष योजना तयार करण्यात आली आहे.

कोरोना महामारीच्या काळात मिळालेल्या अनुभवाचा विचार करून आंध्र प्रदेश आरोग्य विभागाने आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक मजबूत केली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या शहरांमधील वैद्यकीय महाविद्यालये आणि शासकीय रुग्णालयांमध्ये विशेष आयसोलेशन वॉर्ड तयार ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक ठिकाणी अंदाजे १५ खाटांची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. आशा स्वयंसेविका आणि एएनएम कर्मचाऱ्यांच्या व्हर्च्युअल बैठका घेऊन त्यांना आवश्यक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जात आहे.

राज्यात पुरेशा प्रमाणात पीपीई किट्स आणि विषाणू तपासणी किट्स उपलब्ध असल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे. नागरिकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सूचना देण्यात आल्या असून गरज पडल्यास तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, आरोग्यमंत्री सत्यकुमार यादव यांनी नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या देशांमध्ये प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. गेल्या तीन आठवड्यांत या देशांतून परतलेल्या कोणालाही तब्येत बिघडल्यास त्वरित जिल्हा प्रशासन किंवा जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, इबोलाचा संसर्ग झाल्यानंतर काही दिवस किंवा काही आठवड्यांपर्यंत लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका अधिक असतो. अचानक तीव्र ताप येणे, अशक्तपणा जाणवणे, तीव्र डोकेदुखी, घसा खवखवणे, स्नायू दुखणे, उलट्या, जुलाब, पोटदुखी, डोळे लाल होणे आणि भूक मंदावणे अशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound