Home Cities मुक्ताईनगर MS-CIT डिजिटल साक्षरता उपक्रमाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार 

MS-CIT डिजिटल साक्षरता उपक्रमाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार 

0
9


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र ज्ञानमंडळ मर्यादित (MKCL) च्या एमएससीआयटी (MS-CIT) या राज्यव्यापी डिजिटल साक्षरता उपक्रमाला देश पातळीवरील प्रतिष्ठित स्कॉच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डिजिटल साक्षरता श्रेणीतील हा पुरस्कार एमकेसीएलच्या गेल्या २५ वर्षांतील डिजिटल शिक्षण, कौशल्य विकास, सामाजिक समावेशन आणि नागरिक सक्षमीकरणातील सातत्यपूर्ण योगदानाची राष्ट्रीय पातळीवर घेतलेली दखल मानली जात आहे.

दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे आणि वरिष्ठ महाव्यवस्थापक अतुल पाटोदी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्कॉच पुरस्कार हा भारतातील शासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक विकास, कौशल्यवृद्धी आणि नागरिकाभिमुख उपक्रमांसाठी दिला जाणारा एक प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार मानला जातो. एमएससीआयटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कोट्यवधी विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, उद्योजक तसेच सर्वसामान्य नागरिकांना डिजिटल जगाशी आत्मविश्वासाने जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यात आले आहे. एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे यांनी या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करत हा सन्मान एमकेसीएल परिवारासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले. कोट्यवधी विद्यार्थी व त्यांचे पालक, हजारो केंद्रप्रमुख, केंद्र समन्वयक, प्रशिक्षक, नेटवर्क पार्टनर्स, एमएसबीटीई, एमकेसीएलमधील सर्व सहकारी, संस्थापक, मार्गदर्शक तसेच महाराष्ट्र शासनाने दिलेल्या विश्वास आणि पाठबळामुळे हा गौरव प्राप्त झाल्याचे त्यांनी नमूद केले.

एमएससीआयटीने महाराष्ट्रात डिजिटल परिवर्तनाची व्यापक चळवळ उभारली असून, एमकेसीएलच्या महाराष्ट्रभर असलेल्या पाच हजारांहून अधिक अधिकृत शिक्षण केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार आणि परवडणारे डिजिटल शिक्षण पोहोचविण्यात आले आहे. सध्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित युगातील गरजा लक्षात घेऊन एमएससीआयटी अभ्यासक्रमातही मोठे बदल करण्यात आले आहेत. नव्या अभ्यासक्रमामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, डेटा लिटरसी, क्लाऊड कम्प्युटिंग आणि आधुनिक डिजिटल साधनांचा समावेश करण्यात आला आहे. डिजिटल कौशल्यांनी सक्षम महाराष्ट्र आणि एआय रेडी नागरिक घडविण्याच्या दिशेने एमएससीआयटीचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी हा पुरस्कार प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत समीर पांडे यांनी व्यक्त केले.


Protected Content

Play sound