नवीदिल्ली, वृत्तसंस्था | निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी तिहार जेल प्रशासनाला अद्याप कोणतेही पत्र प्राप्त झालेले नाही. परंतु यापूर्वीच जेल प्रशासनाने फाशीच्या शिक्षेची तयारी सुरू केली आहे. त्या आरोपींपैकी सर्वाधिक वजन असलेल्या आरोपीच्या वजनाप्रमाणे रेती भरून एक डमी व्यक्ती तयार करून त्याला फाशी देण्यात आली. निर्भया प्ररकरणातील एका दोषीला मंडोली जेलमधून तिहार जेलमध्ये हलविण्यात आले आहे. या प्रकरणातील अन्य तीन आरोपी यापूर्वीपासूनच तिहार जेलमध्येच बंद आहेत.
जर दोषींना फाशी देण्याचा निर्णय झालाच तर त्यासाठी वापरण्यात येणारा दोर त्यांच्या वजनाने तुटू नये, यासाठी डमी तयार करून फाशी देण्यात आली. यापूर्वी संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या अफजल गुरूच्या फाशीपूर्वीही अशाच प्रकारचे ट्रायल घेण्यात आले होते. फाशी देण्यासाठी वापरण्यात येणारे सर्वच दोर बक्सरमधून मागवण्यात आले असल्याची माहिती तिहार जेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सध्या आमच्याकडे पाच दोर आहेत. परंतु आम्ही बक्सर प्रशासनाशी संपर्क साधत आहेत. लवकरच ११ नवे दोर मागवण्यात येणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले आहे.
फाशी देण्यासाठी जल्लादची गरज नाही. परंतु गरज भासल्यास उत्तर प्रदेश, महाराष्ट्र किंवा पश्चिम बंगालमधून जल्लाद बोलावण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. निर्भया प्रकरणातील चार दोषींपैकी एका दोषीला मंडोलीतील जेल क्रमांक १४ मधून तिहारच्या जेल क्रमांक २ मध्ये हलवण्यात आले आहे.
निर्भया बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एका आरोपीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दयेचा अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रपती केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली सरकारच्या सल्ल्यानुसार अंतिम निर्णय घेणार आहे. दिल्ली सरकारने याआधीच आरोपींचा दयेचा अर्ज स्वीकारु नये असा, अहवाल राष्ट्रपतींना पाठवला आहे. तिहार जेल अधिकाऱ्यांनी २९ ऑक्टोबर रोजी दिलेल्या माहितीनुसार २०१२ च्या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या पाच पैकी चार आरोपींनी मृत्यूदंडाची शिक्षा टाळण्यासाठी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याच्या पर्यायासह सर्व कायदेशीर पर्याय वापरले आहेत. या चारपैकी केवळ एका आरोपीने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला आहे. तर पाच पैकी एका आरोपीने तिहार जेलमध्ये २०१३ साली मार्च आत्महत्त्या केली होती.
काय आहे निर्भया प्रकरण?
दिल्लीत चालत्या बसमध्ये निर्भयावर सामूहिक बलात्कार झाला होता. बलात्कारानंतर नराधमांनी केलेले कृत्य अत्यंत भयंकर आणि माणुसकीला काळीमा फासणारे होते. तिला उपचारांसाठी दिल्लीतील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. तसेच अधिक चांगले उपचार मिळावेत म्हणून तिला देशाबाहेर नेऊनही तिच्यावर उपचार करण्यात आले होते. मात्र, तिला वाचवण्यात यश आले नव्हते. या प्रकरणात एकूण सहा जण दोषी होते. ज्या पैकी एकजण अल्पवयीन होता. दोषींपैकी एकाने तिहार जेलमध्ये आत्महत्त्या केली. यानंतर चार दोषींना दिल्ली उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयाविरोधात दोषींच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यांची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.