मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागातील जिद्द, चिकाटी आणि कष्टांची ताकद पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सिद्ध झाली असून मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा गावाचा सुपुत्र प्रेम श्रीकृष्ण पुरकर याने नेपाळमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत इतिहास घडवला आहे. या दैदीप्यमान यशानंतर चारठाणा गावात प्रेमचे भव्य मिरवणुकीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
नेपाळमधील पोखरा येथील रंगसाला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयोजित ‘युथ गेम इंडो-नेपाळ इंटरनॅशनल सिरीज २०२६’ स्पर्धेत प्रेम पुरकर याने 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत २३ सेकंद ८७ पॉइंट्समध्ये अंतर पार करत प्रथम क्रमांक पटकावला. अत्यंत साध्या व हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीतून पुढे येत प्रेमने मिळवलेले हे यश केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे.

ऐतिहासिक कामगिरी करून प्रेम चारठाणा गावात परतताच आनंदाचे वातावरण उसळले. गावाच्या प्रवेशद्वारापासूनच फुलांच्या हारांनी, गुलाल उधळून आणि जोरदार घोषणाबाजी करत त्याचे स्वागत करण्यात आले. ग्रामस्थ, महिला, युवक तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीमुळे संपूर्ण गाव उत्सवमय झाले होते.
याच स्पर्धेत मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा परिसरातील खेळाडूंनीही उल्लेखनीय कामगिरी करत शेतकरी कुटुंबातील मुलांची आंतरराष्ट्रीय भरारी अधोरेखित केली. ७ ते ९ जानेवारी २०२६ दरम्यान झालेल्या या स्पर्धेत BOY U-17 गटातील ४×१०० मीटर रिले स्पर्धेत या संघाने अंतिम फेरीत द्वितीय क्रमांक पटकावत सिल्व्हर मेडल आणि ट्रॉफी मिळवली. पोखरा स्टेडियमवर मुक्ताईनगरचा आवाज घुमत राहिला.
भारताचे प्रतिनिधित्व करत रौप्य पदक जिंकणाऱ्या संघात संकेत विनोद पाटील (इयत्ता ९ वी), ओम रामेश्वर तायडे (इयत्ता १० वी), प्रेम श्रीकृष्ण पुरकर (इयत्ता ११ वी), हेमंत अर्जुन चोपडे (इयत्ता १० वी) आणि देवेश राजू बोरसे (इयत्ता १० वी) या गुणवंत खेळाडूंचा समावेश होता. विशेष म्हणजे या सर्वांचे आई-वडील शेतकरी किंवा शेतमजूर असून मर्यादित साधनांमध्येही त्यांनी मुलांच्या क्रीडा स्वप्नांना बळ दिले.
योग्य प्रशिक्षण, पोषण, शिस्त आणि पालकांचा भक्कम भावनिक आधार यामुळे या खेळाडूंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण मुक्ताईनगर तालुक्याची मान अभिमानाने उंचावली आहे. विविध सामाजिक व क्रीडा संघटनांकडून या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.



