एम. पी. मिल कंपाऊंड एसआरए घोटाळ्यात प्रकाश मेहता दोषी ; लोकायुक्तांचा अहवाल

prakash mehta

 

मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना एम. पी. मिल कंपाऊंड एसआरए घोटाळ्यात लोकायुक्तांनी दोषी ठरविल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश मेहता यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. तर स्वच्छ प्रतिमा असणारे मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात विकासाच्या फायद्यासाठी नियम डावलून विकासाला एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप मेहतांवर आहे. दरम्यान, गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश दिले होते. मेहता यांनी ही फाइल मंजूर करताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला होता. परंतु, हे प्रकरण बाहेर आल्यानंतर मेहता यांनी चुकून हा प्रकार घडल्याची सारवासारव केली होती. यावरून विधानसभेत जोरदार हंगामा झाला होता. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरत प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण चौकशीसाठी लोकायुक्तांकडे पाठवले होते. त्यानुसार लोकायुक्तांनी राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालात मेहता यांनी मंत्री म्हणून आपली जबाबदारी निष्पक्ष पार पाडली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content