अमळनेरात 50 खाटांच्या अद्ययावत रुग्णालयास मंजुरी; आ.चौधरींच्या प्रयत्नांना यश

1e1db296 cf8b 48b1 bdf5 6fae5c0f0ab9

अमळनेर (प्रतिनिधी) येथील 30 खाटाचें ग्रामिण रुग्णालयाचे आता 50 खाटाच्या अद्ययावत रुग्णालयात रूपांतर होण्यासाठी शासनदरबारी सतत केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे. अमळनेर रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यास दि 4 जून 2019 रोजीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयान्वये मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ.शिरीष चौधरी यांनी नुकतीच दिली.

 

आ.शिरीष चौधरी यांनी दोन वर्षांपासून यशस्वी पाठपुरावा केल्याने हे काम मार्गी लागले असून यामुळे अनेक तज्ञ डॉक्टरांची संख्या वाढून सोयी सुविधा देखील वाढीस लागणार आहे. सदर कामासंदर्भात सार्वजनिक आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी अमळनेर येथे 30 खाटांवरून 50 खाटाचे श्रेणीवर्धन आणि अमळनेर विधानसभा मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसोदे ता. पारोळा येथे 30 खाटाचें ग्रामिण रुग्णालय मंजूर करण्याबाबत आश्वासन देऊन तो प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली होती. यासंदर्भात आ चौधरी यांनी सुरवातीला डिसेंम्बर 2015 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते. या पत्रात अमळनेर विधानसभा मतदार संघाची लोकसंख्या जवळ जवळ 3,60000 इतकी असून मतदार संघालगत शिंदखेडा, पारोळा, धरणगाव व चोपडा या तालूक्यातील गावे जुळलेली आहेत.तसेच सद्यस्थितीत अमळनेर येथे 30 खाटाचें रुग्णालय असून येथे पुरेशा सुविधा उपलब्द होत नाहीत. वाढत्या लोकसंख्येमुळे रुग्णालयातील सोयी व मनुष्यबळावर अतिरिक्त ताण वाढल्याने रुग्णांची काही प्रमाणात गैरसोय होत असल्याचे आ.चौधरी यांनी म्हटले होते.

 

 

एवढेच नव्हे तर, शासनाने नागरिकांचा विचार करून 50 खाटाच्या अद्ययावत रुग्णालयास मंजुरी देऊन गैरसोय थांबवावी अशी मागणीदेखील आ.चौधरी यांनी केली होती. तसेच आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत यांना देखील पत्र देऊन शिरसोदे येथे 30 खाटाचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्याची विनंती केली होती. यानंतर आ चौधरी यांनी आरोग्य सेवा संचलनालायत सतत पाठपुरावा सुरु ठेवल्याने मुंबई येथील आरोग्य सेवेचे सहसंचालक डॉ.एस.के. जाधव यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना एप्रिल 2016 मध्ये लेखी अहवाल सादर करून अमळनेर ग्रामिण रुग्णालयाचे 50 खाटाचे श्रेणीवर्धन करण्याबाबत मंजुरी मिळावी अशी शिफारस केली. यामुळे या प्रस्तावाच्या हालचाली गतिमान झाल्या यानंतर आमदारांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी देखील सकारात्मक शेरा दिल्याने हा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आला होता.आता मंजुरीबाबत शासन निर्णयच झाल्याने श्रेणीवर्धन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

अशा राहतील सुविधा

 

अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटाचें श्रेणीवर्धन करताना तज्ञ डॉक्टरांची संख्या 12 ते 15 पर्यंत वाढून शल्यचिकित्सक, स्त्रीरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, बालरोग, हृदयरोग, दंतरोग, अश्या प्रत्येक विभागाचे स्वतंत्र डॉक्टर उपलब्द असतील. तसेच परीचारिकांची संख्या वाढून प्रत्येक विभागास स्वतंत्र परिचारिका व वॉर्डबॉय असेल. एकंदरीत रुग्णालयाचा संपूर्ण स्टाफ तिपटीने वाढेल. याशिवाय रुग्णालयात आवश्यक त्या सर्व सुविधा व आधुनिक यंत्रसामुग्री उपलब्द होऊन रुग्णांचे पुढील उपचारासाठी धुळे अथवा जळगाव रेफर करण्याचे प्रमाण अतिशय कमी होईल, अशी माहिती अमळनेर ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताळे यांनी दिली. या व्यतीरिक्त रुग्णालयाचे वरील मजल्यावर बांधकाम वाढून सर्व सुविधांयुक्त प्रशस्त इमारत उभी होईल. जर शासनाने ढेकू रोडवरील बांधकाम विभागाजवळील रुग्णालयाच्या आरक्षित जागेत रुग्णालय स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतल्यास तेथे भव्य रुग्णालय उभे राहिल. अन्यथा आहे त्या जागेवरच बांधकाम वाढविले जाणार आहे.  बांधकामासाठी 6 कोटी खर्चाचे अंदाज पत्रक असले तरी चालू डिएसआर रेट नुसार हा बजेट वाढणार आहे. मात्र हे अद्ययावत रुग्णालय अमळनेर मतदारसंघासाठी वरदानच ठरणार आहे. आ शिरीषदादा यांच्या सूचनेनुसार डॉ प्रकाश ताळे यांनी तालुक्याची आरोग्य व्यवस्था व सामाजिक तसेच भौगौलिक स्थिती लक्षात घेऊन परिपूर्ण प्रस्ताव तयार केला.

 

सदर मंजुरीबद्दल आ शिरीष चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व आरोग्य मंत्र्यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत. तर जनतेने देखील आ.चौधरी यांनी आरोग्य सेवेचा मोठा विषय मार्गी लावल्याबद्दल त्यांचेही आभार मानले आहेत. ग्रामीण रुग्णालय 30 खाटा वरून अद्ययावत असे 50 खाटांचे मंजूर केल्याबद्दल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रकाश ताळे यांनी आमदार शिरीषदादा चौधरी यांचा सत्कार केला.

Add Comment

Protected Content