फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून ‘त्या’ नराधमाला फाशी द्या : फडणवीस

मुंबई प्रतिनिधी | येथील साकीनाका भागात अत्याचार झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने समाजमन सुन्न झाले असतांना आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा खटला जलदगती कोर्टात चालवून दोषीला कठोर दंड देण्याची मागणी केली आहे.

साकीनाका येथे अत्याचार झालेल्या महिलेचा आज सकाळी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून आता सरकारवर टीका करण्यात येत आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्य सरकारला धारेवर धरले आहे. बलात्कार प्रकरण माणुसकीला आणि मुंबईच्या आजवरच्या लौकिकाला काळीमा फासणारं प्रकरण आहे. अशी प्रकरणं वारंवार होत राहिली तर असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यामुळे नराधमांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करुन फाशीच झाली पाहिजे, असं मत राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

या संदर्भात फडणवीस म्हणाले की,  मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात जातीनं लक्ष घालून तातडीनं मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांशी बोलून एक विशेष जलदगती न्यायालय स्थापन करुन यात खटला चालवला जाईल यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि पोलिसांनी याप्रकरणाशी निगडीत इतर आरोपींचा तातडीनं शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत, असं फडणवीस म्हणाले.

आरोपींना काय शिक्षा द्यावी हा कोर्टाचा विषय असला तरी याप्रकरणात नराधमांना फाशीच झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी पोलीस दलात नेमकं काय चाललंय याचीही माहिती घ्यायला हवी. महिला सुरक्षाबाबतच्या उपाययोजनेंवर भर द्यायला हवा. सरकारला महिला आयोगाचा अध्यक्ष नेमण्यासही फुसरत नाही, अशी टीका फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली.

 

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!