यावलमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाला खिंडार, दोन पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावलमधील प्रहार जनशक्ती पक्षाच्या अल्पसंख्याक विभागातील दोन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

यावल तालुका अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष मोहम्मद हकीम मोहम्मद याकुब आणि शहर कार्यकारणीचे अध्यक्ष उमर अली मोहम्मद कच्छी यांनी जिल्हा उपाध्यक्ष हाजी शेख हकीम शेख अल्लाउद्दीन खाटीक यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. कौटुंबिक आणि वैयक्तिक कामांमुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले असले, तरी आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.

यावल शहरात लवकरच एका मोठ्या पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असून, या सोहळ्यात मोहम्मद हकीम आणि उमर अली आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या घडामोडींमुळे यावलमधील राजकीय वातावरण तापले असून, आगामी निवडणुकीत याचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रहार जनशक्ती पक्षातील या दोन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाला मोठा फटका बसला आहे. यावल शहरात पक्षाची ताकद कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Protected Content