फैजपूरात काँग्रेसची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बैठक


यावल/सावदा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फैजपूर येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बैठक जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी पक्ष संघटना मजबूत करणे, कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी करणे आणि उमेदवारांची चाचपणी करणे यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना आणि तरुण पदाधिकाऱ्यांना संधी देण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रयत्न असल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी आगामी निवडणुकांसाठी पक्ष संघटना, कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी आणि उमेदवार चाचपणीवर लक्ष देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

या बैठकीत २१ मे रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात भारतीय सैन्य दलाने केलेल्या कारवाईचे अभिनंदन करण्यासाठी ‘तिरंगा शोभायात्रा’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही शोभायात्रा धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथील ‘प्रेरणास्तंभ’ ते छत्री चौकातील ‘स्वातंत्र्य स्मारक’ पर्यंत काढण्यात येणार आहे. भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढवण्यासाठी आणि सैन्याबद्दल अभिमान व्यक्त करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस पक्षाने केले आहे.

या बैठकीला माजी आमदार रमेश चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील, जमील शेख, ज्ञानेश्वर कोळी, संजू जमादार, प्रभाकर सोनवणे, डॉ. राजेंद्र पाटील, लिलाधरशेठ चौधरी, शेखर पाटील, धनंजय शिरीष चौधरी, हरिशशेठ गनवाणी, सैय्यद जावेद अली जनाब, हमीद तडवी, राजू सवरणे, हयात शेठ, रियाज शेख, कलिम मेंबर, अय्युब मेंबर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.