शिक्षक भरतीसाठी १५ दिवसांत सुरू होणार पोर्टल

नागपूर-वृत्तसेवा | शिक्षक भरतीसाठी बिंदू नामवलीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, शिक्षकांच्या समायोजनाचा टप्पा सुरू आहे. येत्या १५ दिवसांत शिक्षक भरतीचे पोर्टल सुरू होईल, अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

विधानपरिषदेत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री केसरकर बोलत होते. राज्यासह उत्तर महाराष्ट्रात अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षक निवृत्त झाले. मात्र, नव्याने शिक्षक भरतीच होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, अनेक दिवसांपासून सुरू असलेली भरती प्रक्रिया पूर्णत्वास न्यावी, अशी मागणी आमदार दराडे यांनी केली.

यावर उत्तर देताना मंत्री केसरकर म्हणाले, की प्रत्येक संस्थेने बिंदू नामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. जिल्हा परिषद व शिक्षण विभागातील यापूर्वी समायोजित झालेले ज्येष्ठ शिक्षक समायोजनातून पूर्ववत ठिकाणी आणले जात आहेत. हा टप्पा पूर्णत्वास गेला, की १५ दिवसांत जिल्हा परिषदेमार्फत जाहिरात देऊन भरती सुरू होणार आहे. जाहिरात निघाली, की पात्र विद्यार्थ्यांना चॉईस दिला जाणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल.

दरम्यान, राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘पवित्र’ संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक, शिक्षक पदभरतीसाठी राज्य सरकारने ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता’ चाचणी परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ दरम्यान ऑनलाइन घेतली. या चाचणीत दोन लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी दोन लाख १६ हजार ४४३ उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली. आतापर्यंत एक लाख ६२ हजार ५६२ उमेदवारांनी स्व:प्रमाणपत्र पूर्ण केले आहे.

२०२३ मधील शिक्षक पदभरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा पोर्टलवर सुरू होण्याची व भरतीच्या पुढील टप्प्याची प्रतीक्षा इच्छुक विद्यार्थ्यांना लागून आहे.

Protected Content