जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील गितांजली कंपनीजवळ तोंडाला रूमाल बांधून घरफोडीच्या उद्देशाने फिरत असलेल्या एका तरूणाला आज शुक्रवारी ३ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुप्रीम कॉलनी जवळील गितांजली केमीकल कंपनीजवळ पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील पोहेकॉ विनोद बोरसे, पो.ना. हेमंत कळसकर, पो.कॉ. साईनाथ मुंढे आणि पो.कॉ. सतीष गर्जे हे कर्मचारी आज गुरूवार ३ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता पेट्रोलिंग करत असतांना एक तरूण संशयास्पद रित्या व हालचाली करत फिरतांना दिसून आला. पोलीस जवळ येताच त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पोलीसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले. ऋषीकेश किशोर विजयवारी (वय-२२) रा. नितीन साहित्या नगर, सुप्रीम कॉलनी जळगाव असे ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. परिसरात कोणत्या कारणासाठी फिरत आहे असे विचारल्यानंतर त्याने समाधान कारक उत्तर दिले नाही. रात्री घरफोडी किवा चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचे पोलीसांनी समजले. याप्रकरणी पो.कॉ. सतिष गर्जे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.