सावकारी ‘पाश’; कुंभारखेड्यात छापे : जाणून घ्या नेमके काय झाले ?

सावदा, ता. रावेर-जितेंद्र कुलकर्णी (Exclusive ) | तालुक्यातील कुंभारखेडा येथे आज सकाळपासून अवैध सावकारीच्या तक्रारींवरून तीन ठिकाणी छापे टाकून कसून चौकशी करण्यात आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

रावेर तालुक्यातील कुंभारखेडा तसेच परिसरातील रहिवासी असणार्‍या नऊ शेतकर्‍यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अवैध सावकारीबाबत तक्रारी केल्या होत्या. या अनुषंगाने उपनिबंधकांच्या निर्देशावरून आज कुंभारखेडा येथील अशोक जगन्नाथ पाटील, अतुल अशोक पाटील आणि नितीन राजेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी सकाळीच सहकार खात्याच्या पथकांचा ताफा दाखल झाला. काही मिनिटांमध्येच त्यांनी घराचा ताबा घेऊन तपासणी सुरू केली. दुपारी साधारणपणे चार वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. या छाप्यांमध्ये तिन्ही ठिकाणची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या कागदपत्रांची छाननी करून तक्रारींच्या अनुषंगाने सखोल चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सहकार खात्याच्या सूत्रांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिली आहे.

दरम्यान, आजच्या कारवाईमध्ये जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथक तयार करण्यात आले होते. यातील पहिल्या पथकात रावेर येथील सहायक निबंधक विजयसिंह गवळी यांच्या नेतृत्वाखाली इब्राहिम तडवी, धिरज पाटील, फकीरा तडवी आणि श्रीमती अनुजा बाविस्कर यांचा समावेश होता. तर, दुसर्‍या पथकात जामनेरचे सहायक निबंधक जगदीश बारी यांच्या नेतृत्वाखाली महेंद्र गाढे, श्रीमती अरूणा तावडे, वाहीद तडवी आणि योगेश सूर्यवंशी यांचा समावेश होता.

काही महिन्यांपूर्वीच रावेर व यावल तालुक्यातील सावकारांवर धडक कारवाई करून १६ शेतकर्‍यांना त्यांची जमीन परत करण्याचा ऐतीहासीक निकाल जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिला होता. या निकालानंतर ठिकठिकाणच्या सावकारांविरूध्द सहकार खात्याकडे तक्रारी करण्यात येत असून याच अनुषंगाने कुंभारखेड्यासह चिनावल येथील एकूण नऊ शेतकर्‍यांच्या तक्रारी अर्जावरून ही कार्यवाही करण्यात आली आहे.

Protected Content