जळगावात रिक्षा चोरीप्रकरणातील सर्व संशयित आरोपींना पोलीस कोठडी

जळगाव प्रतिनिधी । चोरी केलेली रिक्षेतून रात्रीच्या सुमारास दुकान फोडण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या टोळीला शहर पोलीसांनी गुरूवारी पहाटे अटक केली होती. आज शुक्रवारी सहा जणांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

चोरी केलेली रिक्षेतून मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव शहरात दुकान फोडीच्या उद्देशाने फिरणार्‍या 7 जणांच्या टोळीच्या जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी गुरूवारी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेली चोरीची रिक्षा जप्त करण्यात आली आहे. हकिम मोहम्मद शहा (वय-20), अजिज रशिद पठाण (वय-22), मोहम्मद इस्त्राईल बिलाल अहमद (वय-36), दीपक प्रकाश भोसले (वय-20), शंकर विश्वनाथ साबणे (वय-19), रईस समशेर पठाण (वय-21, सर्व रा. गेंदालाल मिल) अशी संशयितांची नावे असून एक अल्पवयीन आहे. संशयितांपैकी दोन जण दोन वर्षासाठी हद्दपार होते, तर इतर हिस्ट्रीशिटर असल्याची माहिती मिळाली आहे.

शिवाजी नगरातून चोरली रिक्षा
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील शिवाजीनगर परिसरातील भूरे मामलेदार प्लॉट मधील रहिवासी राजकुमार चुन्नीलाल जैस्वाल यांच्या मालकीची (एमएच 19, व्ही 3218) क्रमांकाची रिक्षा आहे. शहरात लॉकडाऊन असल्यामूळे त्यांनी आपली रिक्षा घराबाहेर आपल्या अंगणाल लावलेली होती. गुरूवारी सकाळच्या सुमारास त्यांना आपली रिक्षा अंगणात दिसून आली नाही व रिक्षा चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ शहर पोलीसात धाव घेत तक्रार केली होती. शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लॉकडाऊनच्या काळात सर्वत्र शुकशूकाट असल्याने घरफोडी व चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार करुन रात्रीची गस्त वाढविण्यात आली. त्यानुसार डीबी पथकातील कर्मचारी अक्रम शेख, रतन गीते, सुधीर साळवे हे रात्रीच्या सुमारास गस्त घालीत होते. यावेळी त्यांना पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास गांधी मार्केट समोरुन भरधाव वेगात रिक्षात सहा ते सात जण जातांना दिसले. पथकाला संशय आला असता पोलिसांना त्यांचा पाठलाग केला. एका दुकानाचे शटर तोडण्याच्या प्रयत्न करत असतांना पथक धडकले. पोलिसांना पाहून इतर फरार झाले. शंकर विश्वनाथ साबणे , रईस समशेर पठाण हे दोघे पथकाच्या हाती लागले. रिक्षासह दोघांना पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर गुरूवारी रात्री उशीरापर्यंत फरार झालेल्या इतर संशयित आरोपींना पकडण्यात यश आले. आज सर्व संशयित आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Protected Content