Home प्रशासन रावेरात अतिक्रमणानंतर बेशिस्त पार्किंगवर पोलिसांचा दणका 

रावेरात अतिक्रमणानंतर बेशिस्त पार्किंगवर पोलिसांचा दणका 

0
10


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर आता बेशिस्त वाहन पार्किंगविरोधातही प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. नगरपालिकेच्या बुलडोझर ॲक्शनला पोलिस प्रशासनाची साथ मिळाल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक अधिक सुरळीत होऊ लागली आहे. पोलिसांनी रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर धडक कारवाई केल्याने वाहनचालकांमध्ये शिस्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या कारवाईची माहिती शहरभर वाऱ्यासारखी पसरल्यानंतर अनेक वाहनधारकांनी स्वतःहून आपली वाहने मोकळ्या जागेत उभी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली असून नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. दरम्यान, नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सलग तिसऱ्या दिवशीही सुरू राहिली. पंचायत समिती परिसर तसेच स्टेशन रोड भागात बुलडोझर ॲक्शन राबविण्यात आली. प्रशासनाच्या कठोर भूमिकेची दखल घेत अनेकांनी आज आणि काल स्वतःहून रस्त्यावरील अतिक्रमणे काढून घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कारवाईची गरज कमी पडली.

नगरपालिका सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी मंदिरासमोरील रस्त्यावरील अतिक्रमणांवर पुढील टप्प्यात कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित व्यापारी आणि अतिक्रमणधारकांमध्ये हालचाली सुरू झाल्या असून अनेकांनी स्वेच्छेने अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली आहे. आज पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या बेशिस्त वाहनांवर विशेष मोहीम राबविण्यात आली. या वेळी चुकीच्या पद्धतीने पार्किंग केलेल्या वाहनांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली.

पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी नागरिक व व्यापाऱ्यांना आवाहन करताना सांगितले की, रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करू नयेत. व्यापाऱ्यांनीही आपल्या दुकानांसमोर ग्राहकांची वाहने शिस्तबद्ध पद्धतीने पार्क होतील याची काळजी घ्यावी, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही. अतिक्रमण हटाव मोहीम आणि वाहतूक शिस्तीवरील कारवाईमुळे रावेर शहरातील प्रमुख रस्ते अधिक मोकळे होत असून नागरिकांकडून प्रशासनाच्या या संयुक्त मोहिमेचे स्वागत केले जात आहे. शहर कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त ठेवण्यासाठी अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound