


जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी जामनेर तालुक्यात पहाटेच्या सुमारास धडक कॉम्बिंग ऑपरेशन राबविले. जामनेर, पहूर आणि फत्तेपूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाचवेळी कारवाई करत पोलिसांनी तब्बल १८९ रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी केली.
या कारवाईत दारूबंदी कायद्यान्वये १९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, तब्बल ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच एका सराईत आरोपीविरुद्ध हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली, तर ५ अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करण्यात आली. संशयास्पद स्थितीत आढळलेल्या ५२ मोटारसायकली आणि एका रिक्षेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची आरटीओमार्फत तपासणी सुरू आहे.
जामनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७२ आरोपींची तपासणी, एक पाहिजे आरोपी निष्पन्न, सहा दारूबंदी कारवायांमध्ये १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त आणि १० मोटारसायकली व एक रिक्षा ताब्यात घेण्यात आली. पहूर येथे ६४ आरोपींची तपासणी करून १० दारूबंदी कारवायांत २ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय २० मोटारसायकली आणि चार अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करण्यात आली.
फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५३ आरोपींची तपासणी करण्यात आली. तीन दारूबंदी कारवायांमध्ये १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, २२ मोटारसायकली आणि एका अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करण्यात आली.
सण-उत्सवाच्या काळात असामाजिक घटकांवर वचक निर्माण करून नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी अशा प्रतिबंधात्मक कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहतील, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत १७ अधिकारी, १५० पोलीस अंमलदार आणि आरसीपीच्या चार पथकांनी सहभाग घेतला.



