मुंबई प्रतिनिधी । पंजाब अँड महाराष्ट्र बँक (पीएमसी बँक) प्रकरणात भरडलेल्या लाखो ग्राहकांसाठी खुशखबर आहे. घोटाळ्यातील जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचा लवकरच लिलाव होण्याची शक्यता असून जप्त मालमत्तेच्या लिलावासाठी मूल्य निश्चित करण्याबाबत नुकतीच एक जाहिरात प्रसिध्द केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार एचडीआयएल कंपनीच्या संचालकांकडे जवळपास ३० हजार कोटींची मालमत्ता आहे. पीएमसी बँकेत जवळपास ५ ते ६ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा अंदाज आहे. या नुकसानीची वसुली करण्यासाठी बँकेकडून जप्त केलेल्या मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यासाठी बँकेकडून व्हॅल्यूअर नेमणुकीसाठी प्रस्ताव मागवले आहेत. मालमत्तांची विक्री करून नुकसान भरून काढले जाणार आहे. यातून १६ लाख ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ३२ हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. पोलिसांकडून दाखल केल्या जाणाऱ्या चार्जशीटमध्ये एचडीआयएल कंपनीचे संचालक राकेश वाधवा, सारंग वाधवा, माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, बँकेचे माजी अध्यक्ष वरियम सिंग,माजी संचालक सुरजीत सिंग अरोरा यांना आरोपी बनवण्यात आले आहे. दरम्यान, विविध तपास यंत्रणांनी चौकशी दरम्यान जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय बँक प्रशासकाकडून घेण्याची शक्यता आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये विमान आणि यॉटचा, आलिशान मोटारी यांचा समावेश आहे.