घरात बसून राज्य चालविणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिला- नारायण राणे

मुंबई । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत ‘घरात बसून राज्य चालविणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिला’ अशा शब्दात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी हल्लाबोल केला आहे. राज्यातील महाआघाडीचे सरकार जास्त काळ चालणार नसल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी बीबीसी मराठी ला दिलेल्या विशेष मुलाखतीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाची आजही परिस्थिती तुम्ही पाहिली तर मुंबईमध्ये ४६८९ मृत्यू झालेत. आणि महाराष्ट्रात ८१७८ एवढी मृत्यू संख्या आहे. हे सरकार जर मृत्यू थांबवण्यात अपयशी ठरत असेल तर हे सरकार काय कामाचं? रोज नवीन आदेश निघतात, त्याचं पालन होत नाही. जे सरकार जनतेचं संरक्षण करू शकत नाही ते सरकार बदलल्याशिवाय कोरोनावर नियंत्रण मिळवता येणार नाही असं माझं ठाम मत आहे. कारण हे बेजबाबदार सरकार आहे. घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात मी पहील्यांदा पाहिला असल्याचा टोला त्यांनी मारला.

नारायण राणे पुढे म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारच एक वर्ष जाणं मुश्किल आहे. आता अंतर्गत किती वाद आहेत. हे सरकार एकजीव नाही. प्रत्येक पक्षातले अंतर्गत वाद, भिन्न पक्षांचे वाद.. इतके मतभेत असताना हे सरकार एकजीव नाही. तर शरद पवार हे राज्यात काहीही घडवू शकतात असे सूचक वक्तव्य देखील राणे यांनी या मुलाखतीत केले आहे.

Protected Content