नुकसानग्रस्त शेतीचे सरसकट पंचनामे करा : पालकमंत्र्यांचे निर्देश !

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील भोकर आणि पिंप्राळा महसूल मंडळातील २१ गावांना ९ आणि १० जून रोजी आलेल्या वादळी वारे व पावसाने दिलेल्या फटक्यामुळे सुमारे २०९१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून यात बहुतांश केळीचे क्षेत्र आहे. या नुकसानीची आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी थेट बांधावर जाऊन पाहणी करून शेतकर्‍यांशी संवाद साधला. याप्रसंगी अनेक शेतकर्‍यांना आपल्या व्यथा-वेदना सांगतांना अश्रू अनावर झाले. यावेळी ना. पाटील यांनी शेतकर्‍यांना धीर देत शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही देखील दिली

या संदर्भातील माहिती अशी की, तालुक्यातील भोकरसह परिसरातील गावांना ९ आणि १० जून रोजी वादळी वारे आणि अतिवृष्टीचा फटका बसला. यात अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले. राज्यसभा निवडणुकीनिमित्त ना. गुलाबराव पाटील हे मुंबई येथे असल्याने त्यांचे पुत्र जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी लागलीच शेतकर्‍यांच्या नुकसानीची पाहणी केली होती. यानंतर आज, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गाढोदा, भादली खुर्द, भोकर, पळसोद शिवार, कठोरा, करंज, घार्डी, नांद्रा बुद्रुक नंदगाव आदींसह परिसरातील शिवारात थेट बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्या सोबत प्रांताधिकारी सुधळकर, तहसीलदार नामदेव पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, पोलीस निरिक्षक रामकृष्ण कुंभार, तालुका कृषी अधिकारी एस. जे. राऊत, मंडळ कृषी अधिकारी एम. जी. जंगले, कृषी सहायिका अनिता जाधव, वीज व अन्य अधिकार्‍यांची उपस्थिती होती. तसेच याप्रसंगी तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, डॉ. कमलाकर पाटील, कृषी तक्रार निवारण समिती सदस्य डॉ. सत्वशील पाटील, माजी सभापती भरत बोरसे, उपतालुका प्रमुख प्रमोद सोनवणे, योगेश लाठी, गोपाल जीभाऊ, रामचंद्र बापू पाटील, सरपंच योगेश पाटील, देवेंद्र पाटील, लिलाधर पाटील, साहेबराव पाटील, शिवाजी सोनवणे, पोलीस पाटील रवींद्र पाटील, निलेश वाघ, दगडू चौधरी, उपसरपंच एकनाथ सोनवणे, विभाग प्रमुख गजानन सोनवणे, मनोहर पाटील, किशोर पाटील, कृष्णा सोनवणे, जिजाबराव पाटील, सुभाषआप्पा बडगुजर, प्रवीण पाटील, एम.ओ. पाटील, यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

याप्रसंगी शेतकर्‍यांनी अलीकडच्या काही वर्षांमध्ये सातत्याने शेतकर्‍यांना निसर्गाचा फटका बसत असल्याची व्यथा कथन केली. याप्रसंगी अनेक शेतकर्‍यांना आपली व्यथा सांगतांना अश्रू अनावर झाले. दरम्यान, शेतकर्‍यांचे वादळामुळे मोठे नुकसान झाले असून भोकर महसूल मंडळातील २१५१ शेतकर्‍यांचे २०३७ हेक्टर क्षेत्रातील केळीचे नुकसान झाले. तर पिंप्राळा महसूल मंडळातील ६५ शेतकर्‍यांचे ५४ हेक्टर क्षेत्रफळ असे एकूण २२१६ शेतकर्‍यांचे २०९१ हेक्टर क्षेत्रफळाचे नुकसान झाले असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.

यावर पालकमंत्र्यांनी तातडीने सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश दिले. तसेच जिल्हाधिकारी आणि विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींसह बैठक घेऊन शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. तर शेतकर्‍यांनी काही प्रमाणात का होईना आपल्या पीक व्यवस्थापनात बदल करावा असे देखील त्यांनी सुचविले. राज्य सरकारने सातत्याने शेतकर्‍यांच्या हिताची भूमिका घेतली असून या आपत्तीच्या काळात शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे देखील ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

Protected Content