पंतप्रधान मोदी यांची १२ फेब्रुवारी रोजी सभा होण्याची शक्यता

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १२ फेब्रुवारीस जळगावमध्ये जाहीर सभेस येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्या नियोजनाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन, पोलिस, महसूल विभागाच्या बैठका होत आहेत. मोदी या दौऱ्यात ‘मोदी घरकुल आवास योजना’ लाँचिंग करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोदींची सभा कुसुंबा येथील विमानतळासमोरील इंडस्ट्रीयल पार्कमध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी केंद्र व राज्याच्या विविध योजनांचे जे लाभार्थी आहेत त्यांना सभेच्या ठिकाणी बोलविण्याचे नियोजन आहे. सोबतच्या लाभार्थ्यांच्या निवास, भोजन, पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. भव्य मंडप, विजेची सोय, सार्वजनिक शौचालये उभारली जाणार आहेत.

त्यादृष्टीने लागणारा खर्च किती अपेक्षित आहे, त्यासाठी टेंडर मागविण्याची प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. या खर्चाचा अंदाज घेत निधीची मागणी ग्रामविकास मंत्रालयाकडे करावयाची आहे.

जिल्ह्यातील संबंधित योजनांच्या लाभार्थ्यांना एकत्रित बोलविण्यासाठी तयारीला लागा. त्याठिकाणी लाभार्थ्यांची निवास, भोजनाची सोय करावी, असे पत्र ग्रामविकास मंत्रालयाने जिल्हा प्रशासनाला पाठविले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला वरील सर्व सुविधा पुरविण्यासाठी टेंडर प्रक्रिया करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Protected Content