नाशिकची धुरा गिरीश महाजनांकडे ! : पुन्हा आली जबाबदारी

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan ) यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे नाशिक महापालिकेची जबाबदारी सोपविली आहे. आधी त्यांनीच भाजपला दणदणीत यश मिळवून दिले असून यंदा ही कामगिरी रिपीट करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्याकडून मध्यंतरी नाशिकची जबाबदारी काढून ती माजी मंत्री आ. जयकुमार रावल यांच्याकडे देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झाली होती. महाजन यांचे पक्षातील महत्व कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे देखील बोलले जात होते. मात्र त्यांच्यावरच पुन्हा नाशिकची जबाबदारी टाकण्यात आल्याचे वृत्त आहे.

नाशिक ही अतिशय महत्वाची महापालिका असल्यामुळे येथील सत्ता कायम राखण्याची जबाबदारी देखील आपसूकच गिरीशभाऊंवर आली आहे. अलीकडच्या काळात भाजपमधून गळती सुरू झाली असतांना ही गळती थांबवून पक्षाची सत्ता कायम राखण्याचे काम आमदार महाजन यांना करावे लागणार आहे.

दरम्यान, आमदार गिरीशम महाजन हे आधी गोवा तर सध्या उत्तरप्रदेशच्या निवडणुकीच्या प्रचाराला गेले आहेत. मार्च महिन्याच्या प्रारंभी परत आल्यानंतर ते नाशिकची सूत्रे सांभाळतील अशी अपेक्षा आहे. याबाबतचे वृत्त टिव्ही नाईन या वाहिनीने दिले आहे.

Protected Content