रेल्वे उशीराने धावल्याने मनस्ताप : २८ हजारांची मिळणार भरपाई

भुसावळ- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तिकिट आरक्षीत केलेली गाडी सुमारे नऊ तास उशीरांनी धावल्यामुळे झालेला मनस्ताप आणि नुकसान भरपाईसाठी प्रा. डी.एम. ललवाणी यांना रेल्वे प्रशासनाने २५ हजार रुपये भरपाई व ३ हजार रुपये तक्रार खर्च असे २८ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

या संदर्भातील वृत्त असे की,भुसावळातील प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांनी २२ मे २०१८ रोजी गुवाहाटी (आसाम) येथून भुसावळ येण्यासाठी गाडी क्रमांक १५६४८ या रेल्वेचे आरक्षण केले होते. ही गाडी दुपारी ३ वाजता गुवाहाटी रेल्वे स्टेशनवरून निघणे नियोजित होते. त्यामुळे ते आपल्या कुटुंबासह रेल्वे स्टेशनवर आले. मात्र, प्रारंभी त्यांना गाडी साडेसहा तास उशिराने निघेल, असे सांगण्यात आले. यानंतरही गाडी प्लॅटफॉर्मवर आली नाही. दुपारी ३ वाजता सुटणारी गाडी रात्री सुमारे ११.४५ वाजता गुवाहाटी स्थानकावरून निघाली. यामुळे तक्रारदार प्रवासी, सोबत असलेला परिवार व सहप्रवाशांना मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. याबाबत भुसावळ येथे परतल्यानंतर ललवाणी यांनी रितसर लेखी तक्रार केली. त्याला उत्तर न आल्यामुळे त्यांनी वकिलामार्फत गुवाहाटी रेल्वेला रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवली. पण, रेल्वेने दखल न घेतली नाही.

यानंतर त्यांनी जळगाव येथे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे ८ एप्रिल २०१९ रोजी तक्रार केली. उभय पक्षाचा युक्तिवाद ऐकून ग्राहक आयोगाने तक्रारकर्ते प्रा.ललवाणी यांचे म्हणणे अंशत: मान्य करून त्यांना झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल २५ हजार व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी ३ हजार रूपये देण्याचे आदेश दिले. ग्राहक ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या प्रभारी अध्यक्षा पूनम मलिक व सदस्य सुरेश जाधव यांनी हे आदेश दिले. भुसावळ येथील ऍड.धिरेंद्र आर.पाल यांनी तक्रारदारातर्फे बाजू मांडली.

Protected Content