भुसावळकर रणजितसिंह राजपूत यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान

भुसावळ प्रतिनिधी | येथील संस्कृती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह राजपूत यांना दिल्ली येथील कार्यक्रमात केंद्रीय युवक व क्रीडा मंत्रालयाचा अत्यंत प्रतिष्ठेचा राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भुसावळ येथील रणजितसिंह राजपूत यांना काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय युवा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. रणजीतसिंह राजपूत यांनी स्वच्छतेच्या क्षेत्रात विशेष स्वैच्छिक सेवा प्रदान केली आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत त्यांची भुसावळचे स्वच्छता राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच संस्कृती फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी विविध समाजउपयोगी उपक्रम देखील राबविले आहेत. याच कार्याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या औचित्याने केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने त्यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

दरम्यान, नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजीत कार्यक्रमात युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते रणजीतसंह राजपूत यांना युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी मंत्रालयाच्या सचिव उषा शर्मा आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या भारतातील निवासी समन्वयक डियर्ड बॉयडंड उपस्थित होत्या. १ लाख रुपये, पदक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

रणजीतसिंह राजपूत यांच्या माध्यमातून भुसावळकर तरूणाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव करण्यात आला असून त्यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात येत आहे.

Protected Content