शहरात डांबरी रस्ते करताना होणार प्लास्टिकचा उपयोग

फिस्ट फाऊंडेशन, इनरव्हील क्लबचे निवेदन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रस्ते तयार करताना डांबरसोबत प्लास्टिकचा देखील उपयोग करावा अशी मागणी फिस्ट फाऊंडेशन आणि इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनतर्फे मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांना करण्यात आली.

आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत रस्त्यांसाठी पुढील निविदा प्रक्रिया राबविताना त्यात प्लास्टिक वापराची अट नमूद करण्याच्या सूचना अभियंत्यांना दिल्या. जळगाव शहरात नवीन रस्ते तयार करण्याची कामे गेल्या अनेक वर्षापासून झालेली नव्हती. त्यातच अमृत योजना आणि भूमिगत गटारींच्या कामामुळे रस्त्यांची पार वाट लागली. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने अपघातात काहींना जीव गमवावा लागला तर काहींना कायमचे दुखणे जडले. जळगाव शहरात नुकतेच रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली ही जळगावकरांसाठी चांगली बाब आहे.

जळगाव शहरात डांबरी रस्ते करताना ते गुणवत्तापूर्ण आणि टिकाऊ होण्यासाठी केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार डांबरसोबत प्लास्टिक बिटूमीन्स देखील त्यात वापरावे. अशी मागणी करण्यासाठी मंगळवारी फिस्ट फाऊंडेशन आणि इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनतर्फे मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांची भेट घेतली. प्रसंगी फिस्ट फाऊंडेशनचे सकिना लहरी, चेतन वाणी, कल्पक सांखला, लक्ष्मी सांखला, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा नेहा संघवी, इशिता दोशी, नफिसा लहरी आदी उपस्थित होते.

फिस्ट फाऊंडेशनतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात, शहरातील रस्त्यांचे काम करताना ते गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी मक्तेदारावर जबाबदारी करणारे एक परिपत्रक काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहे. शहरात आता नव्याने तयार केल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या कामाला ते लागू करण्यात यावे. रस्ते किमान पुढील १० वर्ष टिकावे यासाठी आताच कामाच्या निविदेत आवश्यक तो बदल करावा, रस्त्यांची कामे पूर्ण होण्यापूर्वी त्याठिकाणी पाईपलाईन दुरुस्ती, ड्रेनेज, इतर केबल संदर्भातील कामे पूर्ण झालेली आहेत की नाही याची खात्री मनपा प्रशासनाकडून करवून घेण्यात यावी. जेणेकरून भविष्यात पुन्हा रस्ता खोदकाम करण्याची आवश्यकता भासणार नाही. जळगाव शहर विकासाच्या टप्प्यावर येऊन ठेपले असून शहरात प्रायोगिक तत्वावर एक रस्ता प्लास्टिक वेस्टचा उपयोग करून तयार करावा, अशी मागणी करण्यात आली.

मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड म्हणाल्या, उदगीर येथे असताना त्यांना प्लास्टिक वेस्टपासून रस्ता तयार करण्याचा उपक्रम राबविला होता. जळगावातदेखील असा उपक्रम राबवता येऊ शकतो. पर्यावरण संवर्धनासाठी जळगाव मनपा प्रयत्नशील असून अनेक उपक्रम विविध संस्थांच्या माध्यमातून राबविले जाणार आहे. जळगावात डांबरी रस्त्यांच्या नवीन कामांची निविदा प्रक्रिया राबविताना त्यात प्लास्टिकचा उपयोग करण्याचे नमूद करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांनी अभियंत्यांना दिल्या.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!