चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयात महिला डॉक्टर आणि परिचारिका कर्मचाऱ्यांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या घटनेचा चोपडा येथील इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) शाखेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या घटनेतील दोषींवर तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आयएमएच्या वतीने तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
आयएमए चोपडा शाखेच्या वतीने गुरुवार, १६ जुलै रोजी शांततामय निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले. आंदोलनादरम्यान डॉक्टरांनी आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत, रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रुग्णांच्या सेवेसाठी दिवस-रात्र कार्य करणाऱ्या महिला डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेला हल्ला हा केवळ वैद्यकीय व्यवसायाच्या प्रतिष्ठेवर आघात नसून लोकशाही मूल्यांनाही धक्का देणारा आहे. अशा प्रकारच्या घटना आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर आणि चिंताजनक असून, दोषींना कठोर शिक्षा होणे आवश्यक असल्याचे आयएमएने म्हटले आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, डॉक्टर आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा हिंसाचार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. वैद्यकीय सेवा देताना डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण मिळणे ही शासनाची जबाबदारी असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणीही करण्यात आली. या निषेध आंदोलनात आयएमए चोपडा शाखेचे अध्यक्ष डॉ. जगदीश सर्वैय्या, सचिव डॉ. राहुल पवार, डॉ. महेंद्र जैस्वाल, डॉ. पराग पाटील, डॉ. लोकेंद्र महाजन, डॉ. विनीत हरताळकर, डॉ. अमित हरताळकर, डॉ. दुर्गेश जैस्वाल, डॉ. सचिन काटे, डॉ. स्मिता पराग पाटील, डॉ. नीता जैस्वाल आणि डॉ. प्रतिभा पाटील यांच्यासह अनेक डॉक्टर उपस्थित होते. आयएमएने राज्य शासन आणि संबंधित प्रशासनाला आरोग्यसेवा क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हिंसाचार रोखण्यासाठी प्रभावी कायदेशीर संरक्षण आणि त्वरित कारवाईची आवश्यकता असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.



