शिक्षकांनी ध्येयवेडाने अध्यापन करून विद्यार्थ्यांना ध्येयवेडे करावे – शशिकांत हिंगोणेकर

निवृत्त शिक्षण उपसंचालक शशिकांत हिंगोणेकर यांचे आवाहन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “शिक्षकांनी ध्येयवेडाने अध्यापन करून विद्यार्थ्यांना ध्येयवेडे करावे.” असे आवाहन निवृत्त शिक्षण उपसंचालक तथा सुप्रसिद्ध साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांनी केले.

तरसोद येथील जि.प.शाळेत शाळा प्रवेशोत्सवाच्या औचित्याने बुधवार, दि.१५ जून २०२२ रोजी तरसोद शाळेचे निवृत्त शिक्षक विजय लुल्हे यांनी पिताश्री निवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापक सुपडू सुतार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. यावेळी भोजनात जिलेबी वाटप करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून मार्गदर्शन करतांना हिंगोणेकर बोलत होते.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी निरीक्षक तथा विस्तार अधिकारी सुनिल जोशी, अभियंता योगेश पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधाकर सोनवणे, निवृत्त राष्ट्रीय पुरस्कृत आदर्श केंद्रप्रमुख भगवान देवरे, भास्कर पाटील, तुकाराम पाटील, सेवानिवृत्त उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे, प्रभारी मुख्याध्यापिका सुषमा पाटील, आत्माराम सावकारे आदी. मान्यवर उपस्थित होते.

पुढील मार्गदर्शन करतांना हिंगोणेकर म्हणाले की, ” शिक्षकांनी अवांतर वाचन करून नेहमी सजग व्हायला पाहिजे आणि सृजनशील अध्यापनाकडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता कालसुसंगत वर्धिष्णू केली पाहिजे.” हिंगोणेकर यांनी विद्यार्थी दशेतील गंमती सांगून “पेढ्यांचे गाव” ही बालकविता सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. शालेय गुरुवर्य पारधी यांच्याबद्दल सश्रद्ध कृतज्ञता व्यक्त करून पारधींनी माझ्यावर काव्य संस्कार करून माझ्यातील कवी घडविल्याचे सांगितले.

प्रतिमा पुजनानंतर हिंगोणेकर यांचा शाल, श्रीफळ, बुके, दिवास्वप्न पुस्तक देऊन प्रभारी मुख्याध्यापिका सुषमा पाटील यांनी सत्कार केला. मे २०२२ अखेर सेवानिवृत्त झाल्याप्रित्यर्थ विजय लुल्हे यांचा शिक्षकवृंदांतर्फे ज्येष्ठ शिक्षिका सुषमा पाटील यांनी सत्कार केला. सृष्टी बहुउद्देशीय युवा संस्था व सावित्री फाऊंडेशन आयोजित ज्येष्ठ साहित्यिकांच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान शशिकांत हिंगोणेकर साहेबांना प्राप्त झाल्या प्रित्यर्थ भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम पुस्तक भिशीतर्फे भिशी जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुसाक देऊन गौरव करण्यात आला.

प्रमुख अतिथी राष्ट्रीय पुरस्कृत भगवान देवरे मार्गदर्शनात म्हणाले की,’ शिक्षक हा केवळ अध्यापक नाही तो सर्वार्थाने शिल्पकार असतो. परिणामी फक्त गुणवत्ता विकासालाच महत्व न देता विद्यार्थ्यांना आदर्श सुजाण नागरिक घडवले पाहीजेत याकडे शिक्षकांनी लक्ष केंद्रीत करावे.आठवड्यातून मी  विद्यार्थ्यांना विद्यादानासाठी शाळेत एक दिवस सेवा देईन याबाबत जाहिर संकल्प केला. या स्तृत्य निर्णयाबाबत हिंगोणेकर साहेबांसह उपस्थित मान्यवरांनी देवरे यांचे विशेष अभिनंदन केले.

संयोजक विजय लुल्हे यांनी मनोगतात पिताश्रींनी दिलेले मूल्यसंस्कार सांगून त्यांच्या त्याग, सेवा, समर्पणाचा वारसा यथाशक्ती चालविण्याचा मानस व्यक्त केला. प्रभारी मुख्याध्यापिका सुषमा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. हिंगोणेकर साहेबांनी शाळा पूर्वतयारी मेळाव्यातील शैक्षणिक स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली व पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांशी प्रेमळ सुसंवाद साधला. त्यावेळी निरीक्षक सुनिल जोशी व योगेश पाटील यांसह पदवीधर  शिक्षक निवृत्ती खडके, मनोहर बाविस्कर, कल्पना तरवटे उपस्थित होते.सुत्रसंचालन विजय लुल्हे व मनोहर बाविस्कर यांनी व आभार प्रदर्शन कल्पना तरवटे यांनी केले.

शालेय पोषण आहारावेळी विजय लुल्हे यांनी विद्यार्थ्यांना स्वतः जिलेबी वाढून सेवा दिल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाची प्रेरणा गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण, शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिमा सानप व असोदा केंद्रप्रमुख भगवान वाघे, निवृत्त केंद्रप्रमुख शिवाजी भैय्या पाटील, निवृत्त प्रभारी केंद्रप्रमुख कवी अरुण वांद्रे यांनी दिली.

कार्यक्रमास अंगणवाडी सेविका साधना पाटील, कल्पना बऱ्हाटे ,कविता शिंदे, तसेच अंगणवाडी मदतनीस नीलिमा गांधिले, निर्मला धनगर, उज्वला गावंडे,सुनिता परदेशी, महेंद्र सोनवणे यांच्यासह पालकांची उपस्थिती होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content