Home Cities जळगाव जळगावात ‘सोशल मीडिया सुयोग्य वापर’ कार्यशाळा उत्साहात 

जळगावात ‘सोशल मीडिया सुयोग्य वापर’ कार्यशाळा उत्साहात 

0
8


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डिजिटल युगात सोशल मीडियाचा प्रभावी, सकारात्मक आणि जबाबदारीने वापर करण्यासाठी जळगावात ‘सोशल मीडिया सुयोग्य वापर’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अजिंठा फिल्म सोसायटी, बालरंगभूमी परिषद (जळगाव), रिफ्लेक्शन फाउंडेशन संचलित पालक शाळा आणि डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही कार्यशाळा बेंडाळे महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

या कार्यशाळेत डिजिटल माध्यमांचा सकारात्मक वापर, सोशल मीडिया व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान, कंटेंट निर्मिती आणि ऑनलाइन सुरक्षेबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सोशल मीडियाचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता समाजप्रबोधन आणि सकारात्मक विचारांच्या प्रसारासाठी कसा करता येईल, यावर भर देण्यात आला. कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सोशल मीडिया अभ्यासक तथा बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीचे प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी अजिंठा फिल्म सोसायटीचे सचिव विनीत जोशी यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. नारखेडे यांचा, तर प्राचार्य डॉ. नारखेडे यांच्या हस्ते प्रमुख मार्गदर्शक योगेश शुक्ल यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. सुचित्रा लोंढे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजिंठा फिल्म सोसायटी आणि डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय यांच्यात शैक्षणिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. तसेच Federation of Film Societies of India (Western Region) च्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल विनीत जोशी यांचा महाविद्यालयाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा सुयोग्य आणि जबाबदारीने वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. समाजप्रबोधन, जनजागृती आणि सकारात्मक विचारांचा प्रसार करण्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम ठरू शकते. भविष्यात बेंडाळे महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठीही अशाच स्वरूपाच्या स्वतंत्र कार्यशाळा आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

मार्गदर्शन सत्रात योगेश शुक्ल यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सोशल मीडियातील परस्परसंबंध स्पष्ट केले. एआय क्षेत्रातील बहुतांश सामग्री सध्या इंग्रजी भाषेत उपलब्ध असून मराठी भाषेतील कंटेंट निर्मिती वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी विविध एआय आधारित ॲप्स, आधुनिक कंटेंट निर्मिती साधने आणि त्यांचा प्रभावी वापर याबाबत उपस्थितांना माहिती दिली. सोशल मीडिया अल्गोरिदम कसे काम करतात, पोस्ट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या बाबी महत्त्वाच्या असतात, हॅशटॅगचा योग्य वापर, व्हिडिओ कंटेंटची निर्मिती आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधण्याच्या पद्धती यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सोशल मीडिया खात्यांची सुरक्षितता राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.

कार्यशाळेच्या अंतिम सत्रात सहभागी कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष एआय टूल्सचा वापर करून व्हिडिओ तयार केले. केवळ सैद्धांतिक माहिती न देता प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने सहभागींचा उत्साह वाढला. या कार्यशाळेत अजिंठा फिल्म सोसायटी, देवगिरी चित्र साधना, रिफ्लेक्शन फाउंडेशन, बालरंगभूमी परिषदेचे कार्यकर्ते तसेच मूळजी जेठा महाविद्यालय आणि जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयातील प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चित्रसाधनाचे प्रांत संयोजक किरण सोहळे यांनी आगामी उपक्रमांचे नियोजन उपस्थितांसमोर मांडले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. वर्षा उपाध्ये यांनी केले, तर आभार प्रदर्शन कार्यशाळा प्रमुख डॉ. सचिन कुंभार यांनी केले.

यावेळी फिल्म सोसायटीचे उपाध्यक्ष अनिल भोळे, डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, डॉ. श्रद्धा शुक्ल, पियुषभाई रावळ, चित्रसाधना सहसंयोजक डॉ. सुचित्रा लोंढे, ॲड. अनघा गोडबोले, पार्थ ठाकर, विभाग संयोजक प्रा. कमलाकर रुगे, संतोष सोनवणे, प्रा. पुरुषोत्तम महाजन यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound