प्रांत व पोलीस निरीक्षकांकडून नियोजनबद्ध षडयंत्र – राजू सूर्यवंशी

WhatsApp Image 2019 08 31 at 8.42.43 PM

भुसावळ, प्रतिनिधी | शहरातील काही राजकारण्यांच्या नादात लागून माझ्याविरुद्ध प्रांत श्रीकुमार चिंचकर व बाजारपेठचे पोलीस निरीक्षक देविदास पवार हे संगनमताने नियोजनबद्ध षड्यंत्र रचून माझे राजकीय अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे माजी सभापती तथा रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी सांगितले.ते आज दि.३१ ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी सूर्यवंशी पुढे म्हणाले की, वर्चस्व असलेला कार्यकर्ता व व्यवसायाने कंत्राटदार असल्याने आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार असल्याने मला प्रांतांकडून विविध प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. विविध जातीचे बोगस दाखले दिल्याने मी त्यांच्याविरुद्ध वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. माझ्यावर तक्रारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. तर पोलीस निरीक्षक पवार कुठलीही शहानिशा न करता चुकीची तक्रार केल्यास खोटे गुन्हे माझ्यावर दाखल करीत होते. माझ्याविरूद्ध षडयंत्र रचून जर कुठेही बोगस गुन्हे दाखल झाल्यास मी व माझी नगरसेविका पत्नी पूजा सूर्यवंशी हे आत्मदहन करतील व जबाबदार ते दोघेच राहतील असा इशाराही राजू सूर्यवंशी यांनी दिला आहे. याप्रसंगी रिपाईचे नेते लक्ष्मण जाधव,सुनील अंभोरे,प्रकाश सोनवणे,विश्वास खरात,बाळू सोनवणे,पप्पू सुरडकर,आनंद सूर्यवंशी आदी उपस्थित होते. दरम्यान याबाबत प्रांत चिंचकर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. तर पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,पोलीस स्टेशन हे सर्वांसाठी खुले आहे.दिलेली तक्रार नियमानुसार नोंदवावी लागते. त्या तक्रारीत तथ्‍य नसल्यास आम्ही ती तक्रार रद्द करतो व न्यायालयात चार्जशीट पाठवत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

Protected Content