चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्या वतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चोपडा येथे सोमवार, दि. १२ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना नामांकित कंपनीमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये पुणे येथील नामांकित क्वेस क्रोप प्रा. लि. कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून विविध पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दहावी, बारावी, आयटीआय, बी.कॉम., एम.कॉम., पदवीधर तसेच इतर पात्रता असलेले उमेदवार या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊ शकतात.

इच्छुक उमेदवारांनी महा स्वयंरोजगार व रोजगार पोर्टलवर नोंदणी करून आपल्या युजर आयडी व पासवर्डद्वारे लॉग-इन करत उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, अशा उमेदवारांनीही सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे.
या प्लेसमेंट ड्राईव्हसंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राउंडजवळ, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा किंवा ०२५७-२९५९७९० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त संदीप ज्ञा. गायकवाड यांनी केले आहे.
या रोजगार मेळाव्यामुळे चोपडा व परिसरातील युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.



