जळगावात महिलांना रोजगाराबाबत ‘पिंक ऑटो रिक्षा’ जनजागृती कार्यक्रम

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील ‘इनरव्हील क्लब ऑफ जळगांव ईस्ट’ आणि ‘जळगाव पीपल्स बँकेच्या बचत गट विभागा’तर्फे महिलांसाठी पिंक ऑटो रिक्षा चालविण्यासंदर्भात तसेच ऑटोरिक्षा रोजगाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनातून ‘जळगाव पीपल्स कोऑप बँक’ व ‘इनरव्हिल क्लब ऑफ जळगाव ईस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने, बचत बटातील महिलांना ‘पिंक ऑटो रिक्षा’बाबत माहिती व उपयुक्तता सांगण्यासाठी पिंक ऑटो जनजागृती कार्यक्रम बँकेचे मुख्य कार्यालय, दाणा बाजार येथे घेण्यात आला. या प्रसंगी अतुल ऑटोचे डिलर विद्याधर नेमाणे, पिंक ऑटो ड्रायव्हर जयश्री शिंदे, रेखा महाजन, इनरव्हिल क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षा निता परमार यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला.

बँकेच्या बचत गट विभाग प्रमुख शुभश्री दप्तरी यांनी प्रास्ताविकात, ‘गरजू महिलांकरीता पिंक ऑटो चालक बनणे ही अत्यंत चांगली रोजगारसंधी आहे. महिलांनी रिक्षा चालक होण्यास न घाबरता या व्यवसायात आपले पाऊल आत्मविश्वासाने टाकले पाहिजे.’ असे सांगितले. विद्याधर नेमाणे यांनी, पिंक ऑटोच्या उपलब्धतेबाबत व ऑटोमध्ये असलेल्या आधुनिक सुविधांबद्दल माहिती दिली. तसेच महिलांना ऑटो ड्रायव्हींग प्रशिक्षण घेऊन ते आत्मसात करणेही सोपे असल्याचे सांगितले.

जयश्री शिंदे व रेखा महाजन यांनी पिंक ऑटो ड्रायव्हर म्हणून आपले अनुभव कथन केले. ‘महिलेने रिक्षा ड्रायव्हर बनणे हे समाजाला वेगळं वाटत असलं तरी, लोक ते मान्यही करतात, कारण हाही एक रोजगार आहे. कुटुंबीयांनी आत्मविश्वास व प्रोत्साहन दिल्याने मोठ्या विश्वासाने शहरात ऑटोरिक्षा चालवीत आहोत. त्यामुळे आज आम्ही आमच्या पायावर सक्षमपणे उभे आहोत, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन सहा बचत गट महिला सदस्यांनी पिंक ऑटो विकत घेवून ड्रायव्हर बनण्यासाठी अनुकूलता दाखवली. सूत्रसंचालन अंजली बोरसे यांनी तर आभार प्रदर्शन निता परमार यांनी केले. कार्यक्रमात क्लबच्या दिशा अग्रवाल, शोभना मकवाना आणि बचत गटचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Protected Content