मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बीकेसीवर झालेल्या मेळाव्यात पैशांची उधळण झाल्याचा आरोप करत याची चौकशी करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
यंदा दसर्याला शिवतीर्थ आणि बीकेसी या दोन्ही मैदानांवरील मेळावे गाजले. यावरून दावे-प्रतिदावे करण्यात आले. यातील शिंदे यांचा मेळावा भव्य ठरला. मात्र यासाठी पैशांचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच संदर्भात सामाजिक कार्यकर्ते दीपक जगदेव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये बीकेसीतल्या दसरा मेळाव्यासाठी खर्च केलेले कोट्यवधी रुपये कुठून आले, त्यांना ते कोणी उपलब्ध करून दिले? असा प्रश्न उपस्थित केला आहे. राज्यातल्या विविध भागांमधून शिंदेंच्या समर्थकांना आणण्यासाठी एसटीच्या १८०० गाड्या आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांची गैरसोय झाली. याची चौकशी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री शिंदेंच्या नोंदणीकृत नसलेल्या पक्षाने १० कोटी रुपये एसटी महामंडळाला कसे दिले, हे पैसे कुठून आले, याची चौकशी व्हायला हवी. या सगळ्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला असून त्याचा ईडी, सीबीआय आणि तपास यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी करा, अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
दरम्यान, बीकेसीवर आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्याला लोकांना आणण्यासाठी समृद्धी महामार्गाचा वापर केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग अजूनही अपूर्ण आहे. पण तरीही त्याचा वापर करून वाहतूक नियमांचं उल्लंघन झालं, त्याचीही चौकशी करा, अशी मागणी करण्यात आली आहे.