खासगी बसला भीषण आग : ११ प्रवाशांचा मृत्यू; ३८ जखमी

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नाशिक ते औरंगाबाद दरम्यानच्या नांदूरनाका येथे खासगी प्रवासी बसला लागलेल्या भीषण आगात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३८ प्रवासी जखमी झाले आहेत.

नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका येथे एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याने ही दुर्घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत अकरा प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. तर ३८ जण होरपळले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. एका ट्रकला धडकल्यानंतर या बसला आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

या अपघातग्रस्त बसमध्ये सुमारे ५० प्रवासी प्रवास करत होते. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही स्लीपर कोच बस होती. यवतमाळहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या या बसचा आणि धुळ्यावरून पुण्याच्या दिशेने जाणारा एक कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. यानंतर बसला आग लागली.

दरम्यान, या संदर्भात एबीपी-माझा या वाहिनीशी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातात ११ जण ठार तर ३८ जण जखमी झाल्याची माहिती दिली. अपघातातील जखमींना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले असून मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत देण्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी दिली.

Protected Content